तेल अवीव : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्षाची संपूर्ण जगाने धास्ती घेतली आहे. या दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्यासठी इस्रायलाने कंबर कसली आहे. तर हिजबुल्लाहदेखील इस्रायलला जशास तसे उत्तर देत आहे. आखाती प्रदेशातील या संघर्षाचा जगातील इतरही देशांवर परिणाम होत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिजबुल्लाह संघटनेने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या खासगी निवासस्थानाच्या परिसरात थेट ड्रोन हल्ले केले आहेत. इस्रायली माध्यमांच्या रिपोर्टनुसार तेथील हाइफा येथील सीजेरिया परिसरात शनिवारी (19 ऑक्टोबर) सकाळीच स्फोटाचा आवाज आला. याच परिसरात नेतान्याहू यांचे खासगी निवसस्थान आहे. इस्त्रायली सैन्याच्या माहितीनुसार हा एक ड्रोन हल्ला होता. हा ड्रोन सीजेरिया परिसरातील एका इमारतीवर आदळला.
नेतान्याहू यांच्या निवासस्थान परिसरात ड्रोन हल्ला
या हल्ल्यात अद्याप कोणतीही जखमी वा मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नाही. सौदी अरेबिया येथील अल हदथ या वृत्तवाहिनीनेही या हल्ल्याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार शनिवारी सकाळी हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता. सीजेरिया या भागात इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे खासगी निवासस्थान आहे. याच भागाला ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आलं. या ड्रोन हल्ल्यासह इतरही दोन ड्रोन हल्ले करण्यात आले होते. मात्र हे दोन्ही ड्रोन हल्ले थोपवण्यात इस्रायली सैन्याला यश आले. या हल्ल्यात नेतान्याहू यांच्या निवासस्थानाला काहीही झालेले नाही.
शनिवारी सकाळी झाला हल्ला
शनिवारी सकाळी लेबनॉनमधून इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेटच्या माध्यमातून अनेक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या तिबेरियास आणि आसपासच्या परिसराला लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यातील अनेक क्षेपणास्त्र हे गॅलिसी सागरात पडताना दिसले. हा हल्ला झाल्यानंतर तेल अवीव आणि शहाराच्या उत्तर भागात दक्ष राहण्यासाठी सायरन वाजवण्यात आले. मात्र तेल अवीव शहरात कोणताही हल्ला झाला नाही.
हल्ल्यानंतर नेतान्याहू यांचा गंभीर आरोप
या हल्ल्यानंतर बेंजामीन नेतान्याहू यांनी एक्स या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा हल्ला करणाऱ्यांना किंमत चुकवावी लागेल, असं ते म्हणाले आहेत. "आम्ही गाझामधील आमच्या नागरिकांना वापस आणू. हिजबुल्लाहने आज मला तसेच माझ्या कुटुंबीयांना मारण्याचा प्रयत्न केला. . जो कोणी इस्रायलच्या नागरिकांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, त्याला किंमत चुकवावी लागेल. दहशतवाद्यांना संपवण्याची आमची मोहीम चालूच राहील," असे नेतान्याहू म्हणाले. त्यामुळे भविष्यात हिजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :