मुंबई : आधीच विरोधकांच्या खेळीनी अडचणीत आलेल्या अजित पवारांवर (Ajit Pawar) एशियन गेम्समध्ये (Asian Games)  सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय खेळाडूंनी (Indian Player) केलेल्या आरोपांमुळे विरोधकांना आता आयते कोलीत मिळाले आहे. गेल्यावर्षी एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत (Kabaddi Tournament) इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी बक्षीस देण्याची घोषणा केली होती. ज्यात अस्लम इनामदार व आकाश शिंदे यांना प्रत्येकी 75 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंना अजूनही हे बक्षीस मिळाले नसल्याचं अस्लम इनामदार याने 'लोकमत'शी बोलतांना म्हटले आहे. 


गेल्यावर्षी एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाच्या वतीने हरयाणा, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील खेळाडू सहभागी झाले होते. भारताच्या या संघाने इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक झाले. विशेष म्हणजे इतर राज्यातील खेळाडूंना प्रत्येकी तीन कोटी रुपये रक्कम देण्यात आली. सोबतच क्लास वन पदाची नोकरी दिली गेली. याचवेळी अजित पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्रातील अस्लम इनामदार व आकाश शिंदे यांना प्रत्येकी 75 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. इतर राज्यातील खेळाडूंचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेत. पण,  महाराष्ट्रातील खेळाडूंना अजूनही बक्षिसाची रक्कम मिळाली नाही. 


नुसत्याच घोषणा...


राजकारणात केलेल्या जाणाऱ्या घोषणा कितपत पूर्ण होतात याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही. अशीच घोषणा एशियन गेम्समध्ये कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंबाबत करण्यात आल्याची चर्चा आहे. इराणचा पराभव करत सुवर्णपदक मिळवणाऱ्या या  खेळाडूंचे त्यावेळी मोठे कौतुक झाले. राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले. अशात महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने मोठी घोषणा करत दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 75 लाख देण्याची घोषणा देखील करण्यात आली. पण ही फक्त घोषणाच ठरली असून, अजूनही त्या खेळाडूंना त्यांच्या बक्षिसाची रक्कम मिळालेली नाही. 


विरोधकांना आता आयते कोलीत


मागील काही दिवसांपासून बारामतीच्या जागेवरून विरोधकांकडून अजित पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे युतीत सोबत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून देखील अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. अशात आता सुवर्णपदक मिळविलेल्या  खेळाडूंना घोषणा करूनही बक्षीसाची रक्कम देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आल्याने अजित पवारांवर टीका करण्यासाठी विरोधकांना आता आयते कोलीत मिळाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


NCP : राष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ, घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिले निवेदन प्रसिद्ध