Tariq Mansoor : पसमंदा मुस्लिम चेहरा तारिक मन्सूर भाजपच्या उपाध्यक्षपदी; अलिगड विद्यापीठाचे कुलगुरू ते पक्षाचा मुस्लिम चेहरा, असा आहे प्रवास
BJP National Team List: उत्तर प्रदेश विधानपरिषद आमदार तारिक मन्सूर यांची भाजपच्या उपाध्यक्षपदावर निवड झाली असून आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
Tariq Mansoor : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली असून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नवीन टीम जाहीर केली आहे. त्यामध्ये 13 राष्ट्रीय अध्यक्ष आणि आठ राष्ट्रीय महासचिव नेमण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या 21 नावांमध्ये एकमेव मुस्लिम नाव आहे आणि म्हणजे उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे आमदार तारिक मन्सूर. अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे (Aligarh Muslim University) माजी कुलगुरू असलेल्या तारिक मन्सूर (Tariq Mansoor) यांची भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Who Is Tariq Mansoor : कोण आहेत तारिक मन्सूर?
तारिक मन्सूर हे पसमंदा मुस्लिम आहेत. मन्सूर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (Aligarh Muslim University) कुलगुरू पदाचा राजीनामा दिला होता. 17 मे 2017 रोजी त्यांनी हे पद स्वीकारले होते. मे 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाल होता, परंतु कोरोनामुळे त्यांचा कार्यकाळ सरकारने एक वर्षासाठी वाढवला. कार्यकाळ वाढवण्यामागे त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) असलेली जवळीक दिसून आली. कदाचित त्यांना कुलगुरूपदाची दुसरी टर्म मिळू शकते, अशी चर्चाही रंगली होती.
पण भाजपची रणनीती वेगळी होती, तारिक मन्सूर यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या काही आठवड्यांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले.
मन्सूर हे AMU चे पहिले कुलगुरू होते ज्यांना विधान परिषदेचे आमदार होण्याची संधी मिळाली. याशिवाय ते जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्यही राहिले आहेत. मन्सूर यांनी एएमयूमधील शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुखाचीही जबाबदारी सांभाळली आहे.
तारिक मन्सूर यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला अनेक अपेक्षा असल्याचे जाणकारांचे मत आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे देशात विशेष नाव आहे. तारिक मन्सूर यांच्या मदतीने भाजप सुशिक्षित मुस्लिम समाजात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. दुसरे म्हणजे पक्षात सध्या बड्या मुस्लिम चेहऱ्याचा अभाव आहे. तो अभाव तारिक मन्सूर भरून काढू शकतात. मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या संघटनेच्या रणनीतीत ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे प्रोफेसर तारिक मन्सूर यांच्या मदतीने भाजप उत्तर प्रदेशातील मुस्लिम व्होट बँकेला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी 29 जागा मुस्लिम बहुल आहेत आणि हे भाजपसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. यापैकी बहुतेक सहारनपूर, मेरठ, कैराना, बिजनौर, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर, संभल, बुलंदशहर, अलीगढ पश्चिम उत्तर प्रदेशात येतात. यापैकी सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, नगीना या जागा भाजपच्या सोप्या नाहीत. रामपूर पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला.
आता तारिक मन्सूर यांच्या माध्यमातून भाजप मुस्लिम व्होट बँकेवर कब्जा मिळवणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
ही बातमी वाचा: