Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
स्मिता जाधव म्हणाल्या की, भाजपकडून मला संधी मिळत आहे. तरुणांसाठी, शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी आभारी आहे.

Smita Jadhav: मी तरुणांसाठी उत्तम काम करत आहे. तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल. काम करण्याचा माझा दोन दशकांचा अनुभव आहे आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना त्याचा योग्य उपयोग होणार असल्याचे स्मिता जाधव यांनी म्हटलं आहे. स्मिता जाधव यांना पुणे पदवीधरमधून उमेदवारी मिळाली आहे. स्मिता जाधव म्हणाल्या की, भाजपकडून मला संधी मिळत आहे. तरुणांसाठी, शिक्षकांसाठी आणि पदवीधरांसाठी काम करण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी आभारी आहे. दरम्यान, शरद लाड यांना डावलून तुम्हाला उमेदवारी दिली, अशी विचारणा करताच त्या म्हणाल्या, या प्रश्नाचे उत्तर मीही पाहत आहे. मी कधीही राजकारणात भाग घेतला नाही. मला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षाही नव्हती.
त्यांचा माझ्यावर आशीर्वाद असणारच
सतेज पाटील यांनी यांच्यासंदर्भात बोलताना सांगितले की, मामांनी मला नेहमी सांगितलं आहे की, आपल्याला चांगलं काम करायचं आहे. आपल्याला लोकांसाठी आणि समाजासाठी चांगलं काम करायचं आहे. चांगलं काम करण्यासाठी ते मला नेहमी प्रोत्साहन देतात. मामांची मी भाची आहे, त्यांचा माझ्यावर आशीर्वाद असणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी?
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघ आणि पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये संघर्ष टोकाला गेला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपला सुटल्यानंतर भाजपकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली. या दोन्ही उमेदवारांचे काल पक्षप्रवेश झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, या दोन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीकडून शह-काटशह सुरु आहे.
वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शरद लाड यांना भाजपकडून पदवीधर मतदारसंघामधून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता, मात्र ऐनवेळी स्मिता जाधव यांनी बाजी मारल्याने शरद लाड यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र शरद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. शरद लाड यांनी आपल्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना पक्षाकडून देण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुणे पदवीधर संघामध्ये भाजपकडून बंडखोरी अटळ मानली जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या




















