Amit Thackeray vs Sada Sarvankar: माहीम विधानसभेतून सदा सरवणकरच निवडून येणार, कारण...; मुख्यमंत्र्यांच्या लेकाने सांगितले 'राज'कारण
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
Mahim Vidhan Sabha Election 2024 मुंबई: माहीम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदा सरवणकरच (Sada Sarvankar) निवडून येणार ही खात्री आहे. यामागचं कारण म्हणजे सदा सरवणकर हे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत. अशा शिवसैनिकाच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उभे राहिलेत, असं खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सांगितले. तसेच जो लोकांसाठी 365 दिवस फिरतो, उपलब्ध असतो, त्यांनाच लोक निवडून देतील याची मला खात्री आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
वरळीमधील आरोपावर श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
वरळी मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याकडून महिलांना भांडी वाटप करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. यावर देखील श्रीकांत शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. पराभव दिसतोय म्हणून हे आरोप होतात. त्या ठिकाणचे आमदार कधीच मतदार संघात फिरकले नाही. काम केली नाही...तसेच वरळीत एक नाही तर तीन-तीन आमदार एक महापौर असून ही परिस्थिती आहे, अशी टीका श्रीकांत शिंदेंनी केली. वरळीतील प्रामुख्याने कामचं सांगायची झाली. तर वरळी कोळीवाड्याची बॉन्ड्रीलाईन आम्ही आखली. बीडीडी चाळीचा विकास असो, त्यांना घरं 50 लाखात मिळत होती. आम्ही ती 15 लाखात केली. त्यामुळे हा मधला टक्का कोणाकडे होता, असा सवालही श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केला.
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव ठाकरेंनी उमेदवार का दिला?
उद्धव ठाकरेंनी पुतण्या अमित ठाकरे यांच्याविरोधात दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात महेश सावंत यांना उमेदवारी दिली. यावर संजय राऊत म्हणाले की, कोणत्या पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा प्रश्न आहे. कोणी कुठे लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही इतकंच म्हणालो, दादर, माहीम, प्रभादेवी येथे शिवसेनेचा जन्म झालाय. हे शिवसेनेचं जन्मस्थान आहे. आम्हाला जन्मस्थान असं कोणाला देता येणार नाही. अनेक भावनिक विषय राजकारणतात असतात, त्यामध्ये दादर आहे. इथे शिवसेनेचा जन्म झाला, 77 ए रानडे रोड, हा शिवसेनेचा पत्ता होता. त्या मतदारसंघात आम्हाला लढावं लागेल इतकीच आमची भूमिका होती, असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. तसेच आणखी कोणता पक्ष लढत असेल तिकडे तर तो त्यांचा प्रश्न आहे, असंही संजय राऊतांनी सांगितले.
मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो- राज ठाकरे
आज अमित ठाकरेंच्या विरोधात जी माणसे उभी आहेत, त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, मात्र त्या घाणीत मला हात घालायचा नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले. तुमच्या हाकेला 24 तास ओ देणारी माणसे हवीत. अमित राज ठाकरे असे जरी नाव असले तरी तुम्हाला त्याला भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.