Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
गोकुळच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीतील सतेज पाटील यांनी पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य केले होते.

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीतील मतभेद आणि मनभेद मिटले आहेत. आमच्यात छोटा-मोठा कोणीच नाही; आम्ही सगळे जुळे भाऊ असून गोकुळची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, महायुतीत एकत्र निवडणूक लढण्याबाबत कधीच शंका नव्हती, असा दावा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. गोकुळच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकमेकांवर आरोपांच्या फैरी सोडणारे नेते एकत्र आले. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी आघाडीतील सतेज पाटील यांनी पाठिंबा द्यावा, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर आता सतेज पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे.
पराभवाच्या भीतीनेच सोबत या म्हणत आहेत
कोल्हापुरात आज पहिल्या मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे पूजन झाल्यानंतर सतेज पाटील यांनी मुश्रीफांच्या पाठिंब्यावर भाष्य केले. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत टोला लगावला. ते म्हणाले, आता पराभव दिसू लागल्यानेच आम्हाला सोबत या म्हणत आहेत. मात्र, गोकुळच्या निवडणुकीत आम्हालाच गणपत्ती बाप्पा पावणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
काय म्हणाले होते हसन मुश्रीफ?
मुश्रीफ यांनी महायुतीच्या बैठकीत बिनविरोध निवडणुकीची शक्यता फेटाळली. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे त्यांनी नमूद केले. "अदृश्य शक्ती आपोआप लुप्त पावली आहे" असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी सतेज पाटील यांना पाठिंब्याचे आवाहन केले. विनाकारण निवडणूक लढण्यात अर्थ नसून सतेज पाटील यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, 1400 संस्थांच्या मनातील रोष दूर केला जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटलं होतं.
4,400 ठराव असल्याने विरोधक उरलेच नाहीत
दुसरीकडे, चंदकांत पाटील यांनी जागावाटपावर सांगितले की, कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या हे लवकरच ठरेल. महायुतीकडे 4,400 ठराव असल्याने विरोधक उरलेच नाहीत, असा दावा चंद्रकांतदादा यांनी केला. पितृपंधरवडा सुरू होत असल्याने अंबाबाईच्या चरणी साकडे घालून प्रचाराचा प्रारंभ केला जाईल. एका घरात भावा-भावांची किंवा पती-पत्नीची भांडणे होतात; इथे तर वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. प्रत्येकाला आपापली माणसे सांभाळायची असतात त्यामुळे मतभेद होतात, पण मतभेदातून मनभेदाकडे जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे ते म्हणाले.
या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र यड्रावकर, माजी आमदार के.पी. पाटील, राजेश पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते. आमदार शिवाजी पाटील आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे या बैठकीला अनुपस्थित होते, त्यामुळे सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या.
इतर महत्वाच्या बातम्या




















