मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महाविकास आघाडीत सुरुवातीपासून सुरु असलेला गोंधळ आता शिगेला पोहोचला आहे. मविआच्या बुधवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत 85-85-85 असे जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अजून अंतिम जागावाटप (MVA Seat Sharing) झाले नसून आम्ही 100 पेक्षा जास्त जागा लढू असा दावा केला होता. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा दावा उधळून लावला आहे. संजय राऊत यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत काँग्रेसच्या 100 जागा लढण्याच्या दाव्याची आपल्या पद्धतीने वासलात लावली.


संजय राऊत यांनी काँग्रेसचा 100 जागांचा दावा सपशेल फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, आता फार घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी मतदारसंघात काही बदल होतील, उमेदवार बदलले जातील, त्याविषयी चर्चा सुरु आहे. पण यापलीकडे काही घडणार नाही, असे सांगत संजय राऊत यांनी मविआचा जागावाटपाचा 85-85-85 हाच फॉर्म्युला कायम राहील, असे संकेत दिले. कालपासून अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. आजदेखील अनेकजण उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे आता 85-85-85 ची बेरीज करण्याच्या फंदात पडू नका. आमच्या 175 जागा निवडून येतील, हीच बेरीज खरी आहे, असे सांगत संजय राऊत यांनी मविआचे जागावाटपाचे गणित चुकल्याचे आरोप फेटाळून लावले.


शिवसेनेकडून काल एक उमेदवार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये काही चुका आहेत, त्या दुरुस्त केल्या जातील. पण 85 जागांबाबत आमचं सर्वांचं एकमत झालं आहे. आता मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या, याबाबत विचार केला जाईल, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.


संजय राऊतांचा मविआतील मित्रपक्षांना टोला


उमेदवारांच्या निवडीतील घोळावरुन ठाकरे गटावर सुरु असलेल्या मित्रपक्षांच्या आरोपांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की,कोण काय आरोप करतंय, याकडे आम्ही लक्ष देत नाही. आता बेलापूरमध्ये संदीप नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि एका तासात त्यांना उमेदवारी मिळाली. सिंदखेड राजा मतदारसंघात राजेंद्र शिंगणे 10 तासांपूर्वी आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. नगरमध्ये निलेश लंके शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या पक्षात होते, शेवटच्या क्षणी ते राष्ट्रवादीत आले. मग या जागांबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केले का, या जागा विकल्या की आणखी काय झाले, याबाबत आम्ही प्रश्न विचारत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. 


उमेदवारांची निवड करताना जिंकून येण्याची क्षमता हा निकष ग्राह्य धरला जातो. त्यामुळे उमदेवारांनी संयमाने बोललं पाहिजे. अनेक कार्यकर्ते 5 वर्षे काम करतात, पण स्पर्धेमुळे ते माग पडतात. सरकार आल्यावर त्याची भरपाई केली जाते. उमेदवारी न मिळालेल्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त होणे किंवा टीका होणे स्वाभाविक आहे. शरद पवार गटाचे राहुल जगताप हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, याचे मलाही दु:ख आहे. त्यामुळे त्यांच्या टीकेबाबत मी काही बोलणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. विजय वडेट्टीवार हे विद्वान गृहस्थ आहेत. पण जागावाटपात बदल होणार नाही. वडेट्वीवार आधी शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले. ते मेरिटवर बोलत आहेत. त्यांचे स्वागत आहे. मविआच्या काही जागा आपापसात बदलल्या जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.


आणखी वाचा


मविआच्या जागावाटपाचं गणित चुकलं, सगळा गोंधळच गोंधळ; काँग्रेस नेमक्या किती जागा लढवणार?