मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची निवड आणि जागावाटपाच्यादृष्टीने नियोजनबद्ध रितीने पावले टाकली जात असताना महाविकास आघाडीत मात्र सध्या सावळागोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे. कारण महाविकास आघाडीने (MVA Seat Sharing) 85-85-85 असा जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करुन 270 जागांचा तिढा सुटल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात या जागांची बेरीज 255 होते, मग मविआचे 15 जागांचे नियोजन कुठे चुकले, असा सवाल निर्माण झाला होता. त्यानंतर मविआच्या नेत्यांकडून सारवासारव करत हिशेब लागत नसलेल्या 15 जागा या मित्रपक्षांसाठी असल्याची सारवासारव करण्यात आली होती. मात्र, एकूण परिस्थिती पाहता जागावाटप आणि उमेदवारांची निवड याबाबत मविआच्या नेत्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसत आहे.


दोन दिवसांपूर्वीच मविआच्या संभाव्य जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेसल पक्षाला 100 पेक्षा जागा मिळणार होत्या. मात्र, बुधवारी जाहीर झालेल्या सूत्रानुसार तिन्ही पक्षांना समसमान म्हणजे 85 जागा मिळत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या 100 जागांचे काय झाले, असा सवाल निर्माण झाला होता. यावर आता काँग्रेसच्या नेत्यांकडून 85-85-85 हा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला नाही, असे सांगण्यात आले आहे. अंतिम जागावाटपानुसार काँग्रेस 100 जागांवर लढणार आहे, अशी माहिती 'एबीपी माझा'ला काँग्रेसमधील उच्चपदस्थ नेत्यांकडून देण्यात आली आहे. 


काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीच्या आतापर्यंत दोन बैठकांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. 25 ऑक्टोबरला परत स्क्रीनिंग कमेटीची बैठक होईल. त्यात आणखी उमेदवारांची नावे निश्चित केली जातील, असे काँग्रेसच्या सूत्रांनी 'एबीपी माझा'ला सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी विधानसभेला राज्यात आरामात जिंकणार, असे चित्र होते. मात्र, उमेदवारांची निवड आणि जागावाटपाचा तिढा सोडवताना मविआच्या नेत्यांचा पुरता गोंधळ उडाल्याचे दिसत आहे. याउलट लोकसभेचा अनुभव लक्षात घेऊन महायुतीचे नेते उमेदवारांची निवड, जागावाटप आणि उमेदवारी हुकलेल्या नेत्यांची मनधरणी या सगळ्या पातळ्यांवर अधिक समन्वयाने काम करताना दिसत आहे.


मविआची पुन्हा बैठक


मविआच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा फॉर्म्युलावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत काँग्रेस १०३, शिवसेना ठाकरे गट ९४ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८४ जागा देण्यावर चर्चा. तर इतर मित्रपक्षांना 7 जागा दिल्या जाऊ शकतात. त्यात शेकाप 2, सपा 2 आणि डाव्या पक्षांना 3 जागा देण्यावर झाली चर्चा. परांडा आणि सांगोला जागेवरुन महाविकास आघाडीत खडाजंगी झाल्याची माहिती आहे. परांड्याची जागा शरद पवार गटाला तर सांगोल्याची जागा शेकापला देण्याची चर्चा झाल्यानंतर ही ठाकरे गटानं जाहीर केल्याने मोठी नाराजी आहे. या दोन्ही जागेत बदल करणार असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले आहे.


काँग्रेसच्या 95 टक्के जागा शुक्रवारपर्यंत जाहीर होतील: विजय वडेट्टीवार


काही जागांची अदलाबदल होऊ शकते, त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्याची कबुली आम्ही दिलेली आहे. त्यामुळे त्यावर काही फार चर्चा करण्याची गरज नाही. महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. 255 जागा क्लिअर झाल्या आहे. मित्र पक्षासाठी काही जागा झाल्या काही जागा आपसात बदल करण्याचा निर्णय आमचा झालेला आहे. आम्ही संख्येवर नाही तर मेरिटवर गेलेलो आहे, आम्ही मेरिटवर  सिलेक्शनवर भर दिला, विदर्भात 42 ते 43 जागा लढणार असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.


विदर्भात काँग्रेसच्या झेंड्याला  मजबुतीने साथ देईल. महाराष्ट्रातील सरकार आणण्यामध्ये विदर्भाची मोठी साथ राहील. काही जागा अदलाबद्दी करायचे असल्यामुळे जागा शिल्लक आहे. त्यामुळे काही जागा होल्डवर ठेवण्यात आल्या आहेत.  काँग्रेसचा वाटा अधिक राहील 100 ते 105 जागा राहील, आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये 52 ते 54 लोकांची नाव असेल, उद्या संध्याकाळी दिल्लीमध्ये उर्वरित जागांसंदर्भात स्क्रीनिंग आहे. काँग्रेसच्या 95 टक्के जागा उद्या संध्याकाळपर्यंत घोषित होतील, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.


आणखी वाचा


महायुतीच्या जागावाटपावर मोठी अपडेट, मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाणार; आता पुढची चर्चा राजधानीतच!