भंडारा : साकोली विधानसभा मतदारसंघात (Sakoli Vidhan Sabha Constituency) काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विरुद्ध भाजपचे (BJP) अविनाश ब्राह्मणकर (Avinash Brahmankar) यांच्यात लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत नाना पटोले यांनी बाजी मारली आहे. आता साकोली विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांचे "मतदारांच्या मनातील आमदार", असा आशयाचे बॅनर झळकले आहे. यामुळे साकोलीत या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. 


साकोली विधानसभा मतदारसंघ साकोली, लाखांदूर आणि लाखनी या तीन तालुक्यात मिळून निर्माण झाला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भंडाऱ्यातील हा सर्वात मोठा मतदार संघ आहे. काँग्रेसचे नाना पटोले हे साकोलीतून आता पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभे होते. यापूर्वी ते खासदारही राहिलेले आहेत. नाना पटोलेंसमोर महायुतीच्या वतीने तगडं आव्हान देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य असलेले ओबीसी चेहरा म्हणून अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपने उमेदवारी घोषित होण्याच्या एक दिवसापूर्वी भाजपात प्रवेश दिला. त्यानंतर त्यांना महायुतीच्या वतीने भाजपकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कडवी लढत दिली. ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत शेवटच्या फेरीत ब्राह्मणकर हे नाना पटोले यांच्यापेक्षा 658 मतांनी आघाडीवर होते. 


चुरशीच्या लढतीत अविनाश ब्राह्मणकरांचा पराभव 


अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या साकोली विधानसभा निवडणुकीत मागील 20 वर्षांपासून नाना पाटोले यांचा गड राहिलेल्या साकोलीत ब्राह्मणकर आणि पटोले यांच्यात अटीतटीची लढत बघायला मिळाली. मात्र, पटोले यांनी पोस्टल मतांनी तारल्यानं ब्राह्मणकर यांचा अवघ्या 208 मतांनी पराभव झाला. ब्राह्मणकर हे या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, नाना पटोले यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला या निवडणुकीत सहज विजय मिळाला नाही. 


मतदारांच्या मनातील आमदार


ब्राह्मणकर यांनी नाना पाटोले यांना ईव्हीएमच्या मतमोजणीत पराभूत केल्यानं नागरिकांच्या मनामनात ब्राह्मणकर यांना वेगळं स्थान मिळालं. त्यामुळेचं ब्राह्मणकर हे या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांनी "मतदारांच्या मनातील आमदार" अशा आशयाचे बॅनर साकोली विधानसभा क्षेत्रात लावले आहेत. हे बॅनर सध्या भंडारा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Congress  : राज्यात काँग्रेसची पडझड, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी; नाना पटोलेंचा दिल्लीत तळ


Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'