'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
Rohit Patil: वचननामात शेती, शिक्षण आणि विशेषतः तासगाव-कवठे मंकाळमधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिले आहे. निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय आहे.

Rohit Patil: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटील यांनी "ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा" ही टॅगलाईन निश्चित केली आहे. विधानसभेला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले, तसाच विश्वास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांवर ठेवावा, असे आवाहन रोहित पाटील यांनी केलं आहे. राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्या तरी आम्ही या निवडणुका तुतारी चिन्हावर लढवू असेही रोहित पाटील म्हणाले. तासगाव नगरपालिका विरोधकांनी जिंकल्यामुळे या निवडणुकीत आम्हाला फार मोठे आव्हान निर्माण होईल असं वाटत नाही असेही रोहित पाटील म्हणालेत.
आधी लगीन कोंढाण्याचं
रोहित पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात राज्य शासनाचा निधी आणि इतर प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदारसंघात चांगली कामे आणली आहेत. झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच हे सर्व घटक आपल्या विचारांचे असल्यास काम अधिक गतीने होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. लग्नाविषयीच्या चर्चेवर उत्तर देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील संदर्भाचा वापर करत "आधी लगीन कोंढाण्याचं" (म्हणजेच आधी निवडणुकीत विजय मिळवणे) ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले.
जाहीरनाम्यात आहे तरी काय?
वचननामात शेती, शिक्षण आणि विशेषतः तासगाव-कवठे मंकाळमधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिले आहे. द्राक्ष शेतीशी संबंधित उद्योग न आल्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणे हा त्यांच्या अजेंड्यावरील मुख्य विषय आहे. हा जाहीरनामा गेल्या आठ वर्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अभ्यासातून तयार केला आहे. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, CSR (Corporate Social Responsibility) मधून उपलब्ध होणाऱ्या फंडाच्या माध्यमातून सेवेचे काम करण्यावर त्यांनी भर दिला आहे.
तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील
रोहित पाटील यांनी स्पष्ट केले की, पक्षाचे 'मुख्य प्रतोद' असल्याने पक्षाशी सुसंगत निर्णय घेणे जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवतील. हा निर्णय मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या यशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तिथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वतः कर्तृत्ववान असल्याने ते निवडून आले, त्यात कोणाच्या मदतीचा मोठा भाग नव्हता. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता, "दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करून पुढे जायचे" असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या




















