Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
Ravindra Chavan Pune Election Campaign : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

पुणे : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी घेतलेल्या दोन दिवशीय तुफानी दौऱ्यामुळे भाजप-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यकर्त्यांच्या भव्य संमेलनातून पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
सहा जिल्ह्यांतील कोर्ड कमिटीच्या आढावा बैठका
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील भाजप कोअर कमिटीच्या संघटनात्मक आढावा बैठका घेतल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी मोहीम अधिक तीव्र करणे, बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करणे आणि प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवणे याबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिल्या.
जुनी पेन्शन समन्वय संघाचा महायुतीला पाठिंबा
या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची घडामोडी म्हणजे 'महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या' पदाधिकाऱ्यांसोबत झालेली बैठक. या संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन रविंद्र चव्हाण यांना सादर केले. यावेळी जुनी पेन्शन समन्वय संघाने पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आपला पूर्ण उघड पाठिंबा जाहीर केला.
अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांची माघार
कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या बैठकीदरम्यान अपक्ष उमेदवार नंदकुमार सागर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून आपली उमेदवारी मागे घेत भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच पुणे येथील कार्यकर्ता संमेलनात रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शरद लाड यांना भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
"युवकांच्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महायुती कटिबद्ध"
संमेलनाला संबोधित करताना रविंद्र चव्हाण म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुती सरकार तरुणांना शिक्षण, करिअर आणि स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी आणि शिक्षक-पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अभ्यासू उमेदवार दिले आहेत. महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढील काही दिवस पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे."
या दौऱ्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
ही बातमी वाचा:



















