Rajya Sabha Election 2022 : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांवरुन (Rajya Sabha Election) घमासान सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. एरवी ज्यांची कधी चर्चा होत नाही, असे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीमुळे अचानक महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आता या आमदारांना गळ घालताना दिसत आहेत. यासोबतच राज्यसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि या निवडणुकीत कुणाला दगाफटका होणार? याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. 


विरोधी मतदान केलं तरी आमदारकी रद्द होते का? असा प्रश्न आमदारांबरोबरच सर्वसामान्यांनाही पडतो. पण याबाबतची माहिती सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपसाठी चिंता वाढवणारी आहे. जर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या आमदारांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारा विरोधात मतदान केलं तर काय होईल? काँग्रेस, राष्ट्रवादीच्या किंवा शिवसेनेच्या किंवा महाविकास आघाडीसोबत असलेल्या इतर कोणत्याही छोट्या पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केलं? किंवा भाजपच्या आमदारांनी भाजपच्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं तर त्या आमदाराची आमदारकी रद्द होणार का? या प्रश्नाची चर्चा सध्या होताना दिसत आहे. 


क्रॉस व्होटिंग केल्यानं आमदारकी रद्द होणार नाही 


'एबीपी माझा'नं निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाचे याबाबतचे संदर्भ तपासले असता, महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. जर एखाद्या आमदारानं आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केलं, तर त्याची आमदारकी रद्द होणार नाही, असं निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीमध्ये लिहिलं आहे. पण यामुळे संबंधित आमदारावर पंक्षांतर्गत कारवाई होऊ शकते, असंही नमूद करण्यात आलं आहे. 


राज्यसभा निवडणुकीत फाटाफुट होऊ नये म्हणून सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजप अशा दोन्ही बाजूंनी खबरदारी घेतली जात आहे. अशा वेळी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आमदार अपात्र ठरत नाही, अशी माहिती निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या याआधीच्या निकालात समोर आली आहे. असं असलं तरी मतदानानंतर पक्षाच्या प्रतिनिधीला मतपत्रिका दाखवण्याचं आमदारांवर बंधन असतं. त्यावेळी क्रॉस व्होटिंग केल्याचा आक्षेप प्रतिनिधींनी घेतला तर निवडणूक अधिकारी ते मत बाद ठरवू शकतो, असा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. अशा वेळी निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका महत्त्वाची ठरते, असं मत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून याआधी काम पाहिलेले विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांनी व्यक्त केलं आहे. 


दरम्यान, राज्यसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर आली असताना आमदारांना सुरक्षित ठेवण्याची रणनीती सर्वच पक्षांनी आखली आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या बैठका घेऊन त्यांना विश्वास देण्याचा सिलसिला सुरु झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (सोमवारी) शिवसेना आमदारांची बैठक घेतल्यानंतर आज ते महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान काल रात्रीपासून शिवसेनेचे आमदार मुंबईत मढ इथल्या हॉटेल रिट्रीटमध्ये मुक्कामी आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. आज दोन्ही पक्षांच्या आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये वेगवेगळी बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. भाजपच्या आमदारांना हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात येणार आहे. 9 तारखेला भाजपची ताजमध्ये बैठक होणार असून आमदारांना मतदानाचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :