Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे दिवस सुरू झाले आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेचीही निवडणूक होते आहे. पण एरवी विधानपरिषद म्हटलं की इच्छुकांच्या दिल्लीवाऱ्या, लॉबिंगसाठी नेत्यांची झुंबड उडते. पण यावेळी मात्र या सगळ्याला आळा बसला आहे आणि त्याचं कारण ठरला आहे कोरोना. 


राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे आणि त्यानं विधानपरिषदेकडे डोळे लावून बसलेल्या नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.  तुम्ही म्हणाल आता विधान परिषदेच्या आमदारकीत कोरोनाचा काय अडसर. तर अडसर हा आहे की भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांना कोरोनानं पछाडलंय. त्यामुळे विधान परिषदेसाठीचं लॉबिंग पूर्णपणे बंद झालंय अन् इच्छुकांची पंचाईत झालीय. हातावर हात धरून यादी जाहीर होण्याची वाट बघण्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत.
 
भाजपमध्ये विधान परिषदेचे आमदार ठरवण्यात ज्यांचा शब्द सर्वात महत्त्वाचा ते देवेंद्र फडणवीस सध्या कोरोनाग्रस्त आहेत तर दुसरीकडे पद कुठलंही असो त्याच्या लॉबिंगसाठी काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीवारी ठरलेली असते. पण सोनिया, प्रियांका गांधी या तर कोरोना पॉझिटिव्ह आहेतच..पण सोबतच संघटन महासचिव केसी वेणुगोपाल हेदेखील कोरोनाग्रस्त आहेत. काँग्रेसमध्ये नेत्यांसाठी हायकमांड पर्यंत पोहोचण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे केसी वेणुगोपाल. पण तोच दरवाजा आता कोरोनामुळे बंद झाला आहे.


महाराष्ट्रात एकीकडे बऱ्याच वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक मतदानाद्वारे होत आहे. त्यामुळे दहा तारखेच्या मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष आहे.. पण त्याआधी विधान परिषदेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे 9 जून. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद पण मतदानाद्वारे होणार की बिनविरोध याचे उत्तर नऊ तारखेला कळेल..


अर्ज भरायला आता दोनच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे पुढच्या एक-दोन दिवसात ही नावं जाहीर होतील.सगळं काही सुरळीत असतं तर दिल्लीत सध्या काँग्रेस-भाजपच्या इच्छुकांची झुंबड उडाली असती. पण निर्णय ज्यांच्या हातात असे दोन्ही पक्षाचे नेते कोरोनाग्रस्त झाले आणि त्यामुळे यावेळी लॉबिंगला संधी दिसत नाहीय.


विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार आमदार आरामात निवडून येतात तर पाचव्या उमेदवारासाठी त्यांना अधिकचे प्रयत्न करावे लागतील. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे पाच आमदार आरामात निवडून येतात तर सहाव्या जागेसाठी त्यांना काही मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही रस्सीखेच होऊन शेवटी मतदानाची वेळ येणार का हे पाहावे लागेल. पण तूर्तास उमेदवारांच्या निवडीची मात्र कोरोनाच्या सावटातच जाहीर करण्याची वेळ आली आहे.



इतर महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली; 'या' त्रिमूर्तींवर विशेष जबाबदारी 


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीआधी 'मविआ'ला धास्ती, सर्व आमदारांना ठेवणार हॉटेलमध्ये


Rajya Sabha Election 2022 : अपक्ष आणि इतर 29 आमदार किती महत्त्वाचे, घोडेबाजार होणार?
Rajya Sabha Election 2022 : राज्यात घोडेबाजार शब्दावरून राजकारण, मात्र घोडेबाजारचा अर्थ काय?