मुंबई : एरवी ज्यांची कधी चर्चा होत नाही असे छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना राज्यसभा निवडणुकीमुळे अचानक महत्त्व प्राप्त झालं आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे नेते आता या आमदारांना गळ घालत आहेत. समाजवादी पक्षाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून समाजवादी पक्षाच्या आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती सपाला करण्यात आली आहे. तसंच पत्रातील मागण्यांचा सकारात्मक विचार करु असं आश्वासनही सपाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


तर तीन मतं असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना तर भाजप आणि शिवसेनेकडून विनवणी करण्यात येत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल ठाकूर यांची विरारमध्ये जाऊन भेट घेतली. त्याआधी रविवारी शिवसेनेचे नेते हितेंद्र ठाकूर यांना भेटले होते. निवडणुकीची धामधूम सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (6 जून) चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी भेट दिली. भिन्न विचारसरणी असलेल्या एमआयएमच्या आमदारांशी शिवसेनेने पाठिंब्यासाठी संवाद साधल्याचा दावा एमआयएमच्या आमदाराने केला आहे. तर कृषीमंत्री दादा भुसे यांनी पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती, अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली आहे.


लहान पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा कोणाला?
- तीन आमदार असलेल्या हितेंद्र ठाकूर यांची भूमिका अजूनही अस्पष्ट
- दोन आमदार असलेल्या समाजवादी पार्टीची तूर्त तटस्थ राहण्याची भूमिका
- दोन आमदार असलेल्या एमआयएमची भूमिका असदुद्दीन ओवेसी ठरवणार
- दोन आमदार असलेल्या बच्चू कडू यांची धान, हरभऱ्यासाठी अनुदानाची मागणी, त्यामुळे शेवटच्या क्षणी निर्णय घेण्याची बच्चू कडू यांची भूमिका
- अपक्ष आमदार आशिष जयस्वाल शिवसेनेच्या आमदारांसोबत, पण निधी वरुन सरकारला इशारा
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा घोडेबाजार शब्दावरुन शिवसेनेला इशारा, भूमिका अस्पष्ट


आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड
राज्यसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसावर आली असताना आमदारांना सुरक्षित ठेवण्याची रणनीती सर्वच पक्षांनी आखली आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या बैठका घेऊन त्यांना विश्वास देण्याचा सिलसिला सुरु झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना आमदारांची बैठक घेतल्यानंतर आज ते महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हॉटेल ट्रायडेंटमध्ये ही बैठक होणार आहे. दरम्यान काल रात्रीपासून शिवसेनेचे आमदार मुंबईत मढ इथल्या हॉटेल रिट्रीटमध्ये मुक्कामी आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. आज दोन्ही पक्षांच्या आमदारांची हॉटेल ट्रायडेंटमध्ये वेगवेगळी बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. याशिवाय भाजपच्या आमदारांना हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये ठेवण्यात येणार आहे. 9 जून रोजी भाजपची ताज हॉटेलमध्ये बैठक होणार असून आमदारांना मतदानाचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.


समर्थक आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची आणि अपक्ष आमदारांची बैठक घेतली. समर्थक आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे  म्हणाले की, "बघता बघता यशस्वी अडीच वर्षे आपण पूर्ण केली आहेत. येणारी अडीच वर्षेही आपलीच आहेत. आपल्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपल्याला सामान्य शिवसैनिकांना न्याय द्यायचा आहे. संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे. संजय पवार शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. एका कट्टर शिवसैनिकासाठी आपल्याला लढायचं आहे."