Election Result 2022 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा पंजाब निवडणुकीत विजय झाला. या विजयाबद्दल शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन केले. केजरीवाल यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंजाबमधील विजयाबद्दल पंतप्रधानांनी गुरुवारी रात्री ट्विट करून आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विट करत त्यांचे आभार मानले.


पंजाब निवडणुकीतील विजयाबद्दल आम आदमी पक्षाचे अभिनंदन, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. ''मी पंजाबच्या कल्याणासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देतो.'' अशा आशयाचं ट्विट मोदी यांनी केले. पंतप्रधानांच्या या ट्विटला उत्तर देताना केजरीवाल यांनी ''धन्यवाद सर.'' असं ट्विट केले आहे.






पंजाबमध्ये 'आप'ने जिंकल्या एकूण 92 जागा


विशेष म्हणजे पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने गुरुवारी झालेल्या मतमोजणीत राज्य विधानसभेच्या 117 पैकी 92 जागा जिंकल्या आणि काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल-बसपा युतीला मागे टाकले.


'आप'कडून अनेक बड्या नेत्यांचा पराभव


या निवडणुकीत मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, शिरोमणी अकाली दलाचे नेते दिग्गज प्रकाशसिंग बादल, त्यांचे पुत्र सुखबीर सिंग बादल आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांसारख्या बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंजाब मधील तीन चतुर्थांश जागा 'आप'ने जिंकल्या आहेत, तर काँग्रेसला 18, एसएडीला 3, भाजपला 2 आणि बहुजन समाज पक्षाला (बसपा) एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha