Punjab Election Result 2022 : पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा साप केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आलेल्या आपच्या त्सुनामीमध्ये अनेकांच्या नौका बुडाल्या आहेत. 


उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी यांचाही पराभव झाला आहे. अमृतसर सेंट्रल या विधानसभ मतदार संघातून अजय गुप्ता यांनी ओम प्रकाश सोनी यांचा पराभव केला आहे. ओम प्रकाश सोनी अमृतसह सेंट्रलमधून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2007,2012 आणि 2017 मध्ये ओम प्रकाश सोनी यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता आपच्या त्सुनामीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.


पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. अंतर्गत कलहाचा पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. याचा फटका काँग्रेसला बसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार चरणजीत सिंह  चन्नी यांना चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागेवर पराभव झाला आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. ते फक्त 12 वी पास आहेत. तर चमकौर साहिब या मतदार संघातून डॉक्टर चरणजीत सिंह यांनी काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांनी तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. 2007 पासून ते आमदार आहेत. पण आता चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवरुन पराभव स्विकारावा लागला आहे. (Charanjit Singh Channi lost both his seats) इतकेच नाही तर पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये आप पक्षाने सत्तास्थापनेची संख्या पार केली आहे. पंजाबमध्ये आप एकहाती सत्ता स्थापन करेल.  


चरणजीत सिंह चन्नी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अंतर्गत वादांमुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. पण तरिही पंजाबमध्ये काँग्रेससमोरील अडचणी कमी झाल्या नव्हत्या. नवज्योज सिंह सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाद समोर आला होता. याचाही फटका काँग्रेसला बसला. सिद्धू आणि चन्नी यांना आपली जागावी वाचवता आली नाही. दोघांनाही पराभवचा धक्का बसला आहे.