मुंबई : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या पाच पैकी चार राज्यांत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. भाजपच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूचीच चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. बरेच जण या निवडणुकीच्या निकालाचा संबंध 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाशी जोडत आहेत. "2022 मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालातून 2024 च्या निकालाची झलक दिसते," अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. परंतु राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे या युक्तिवादाशी सहमत नाहीत. त्यांचा विचार यापेक्षा वेगळा आहे. "भारतासाठी निर्णायक लढाई 2024 मध्येच आहे."


काय म्हणाले प्रशांत किशोर?
पाच राज्यातील निवडणूक निकाल पाहून प्रशांत किशोर यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "भारतासाठी निर्णायक लढाई 2024 मध्येच आहे. 2024 ची लढाई राज्यांच्या निकालावरुन ठरणार नाही. साहेब देखील हे जाणतात. त्यामुळे विरोधकांवर निर्णायक मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी ते राज्याच्या निकालांवरुन वातावरण निर्मिती करत आहेत. पण अशाप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नका किंवा त्यात अडकू नका."






या निवडणुकांनी 2024 चा निकाल निश्चित केला : नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (10 मार्च) पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि यावेळी ते म्हणाले की, या विधानसभा निवडणुकांनी 2024 लोकसभा निवडणुकीचे निकाल निश्चित केले आहेत.


वेळोवेळी भाजपविरोधात भूमिका
2014 मधील भाजपच्या निवडणूक प्रचारात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. पण गेल्या काही वर्षांत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन सारख्या नेत्यांसोबत काम केलं. आता प्रशांत किशोर हे भाजपचे कट्टर विरोधक मानले जातात.  वेळोवेळी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका मांडली आहे. 


पाचपैकी चार राज्यात भाजपची सत्ता
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर झाले. या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुफडा साफ केला असून या राज्यात ते सरकार स्थापन करणार आहेत.