लोकवर्गणीतून निवडणूक लढणारा उमेदवार उर्मिला मातोंडकर, गोपाळ शेट्टींना टक्कर देणार
रहिवाशांना विलास यांच्यात असा एक नेता दिसतो जो त्यांचे भविष्य सुधारु शकेल आणि म्हणूनच त्यांनी विलास यांना निवडणुकीसाठी तयार केलं आहे.
मुंबई : उत्तर मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून यंदा शेती व मजुरी करणारा एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. या उमेदवाराला गरीब उमेदवारांपैकी एक मानलं जात आहे. या उमेदवाराची टक्कर गोपाळ शेट्टी आणि उर्मिला मातोंडकर यांच्या सोबत होणार आहे. विलास हिवाळे असं या उमेदवाराचं नाव आहे.
विलास यांनी आपल्या प्रचारासाठी कुठलीही बाईक रॅली काढलेली नाही किंवा कुठलाही मोठा रोड शो केलेला नाही. विशेष म्हणजे विलास हिवाळे लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवत आहेत. स्थानिक लोकांनी पैसे गोळा करुन त्यांचे निवडणूक डिपॉझिट भरले आहे. कांदिवलीच्या चारकोप भागात एका वसाहती मध्ये ते राहतात. या संपूर्ण परिसरात जवळ पास 500 कुटुंब राहतात. दिवस भर मजुरी करुन ते पोटासाठी 400-500 रुपये कमवतात.
याठिकाणच्या रहिवाशांना विलास यांच्यात असा एक नेता दिसतो जो त्यांचे भविष्य सुधारु शकेल आणि म्हणूनच त्यांनी विलास यांना निवडणुकीसाठी तयार केलं आहे. विलास सीपीआई (Marxsist-Leninist) पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
सगळे श्रीमंत उमेदवार लोकसभेत जातात, ज्यांना गरिबांचे प्रश्न काही सोडवता येत नाहीत. माझ्या सारख्या एका गरीबाने का नाही उतरावे निवडणुकीत? अशी प्रतिक्रिया विलास हिवाळे यांनी दिली. माझे निवणुकीचे डिपॉझिट येथील स्थानिक लोकांनी 50-100 रुपये गोळा करुन भरले आहे, असं विलास हिवाळे यांनी सांगितलं.