Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये निवडणुकीला गालबोट, 'आप'च्या उमेदवारावर रोखली थेट बंदूक, जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप
Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, प्रभाग क्रमांक 11 मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सातपूर (Satpur) परिसरात आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) उमेदवार समाधान आहेर (Samadhan Aher) यांच्यावर प्रचारादरम्यान थेट बंदूक ताणून धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान आहेर हे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचारासाठी फिरत असताना एका तरुणाने अचानक त्यांच्यासमोर बंदूक काढून “प्रचाराला फिरायचे नाही” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बंदूक ताणणाऱ्या तरुणाला पकडले.
Nashik Municipal Election 2026: 'तो' प्रकाश लोंढेंचा कार्यकर्ता; आपचा आरोप
संतप्त जमावाने त्याला चोप देत नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणात आम आदमी पक्षाने गंभीर आरोप केला आहे. बंदूक ताणणारा युवक हा जेलमधून निवडणूक लढवत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे.
Nashik Municipal Election 2026: व्हिडिओ व्हायरल, नाशिकमध्ये खळबळ
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये बंदूक दाखवून धमकावल्याचा प्रकार दिसत असल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात उमेदवारांवर अशा प्रकारे थेट शस्त्राने धमकी देण्याची घटना अत्यंत गंभीर मानली जात असून, या प्रकारामुळे नाशिकमधील निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीत सलीम कुत्ता प्रकरणाला पुन्हा उजाळा
दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीत आरोप–प्रत्यारोप आणि टीका–टिप्पणीला जोर चढला असून त्यातच प्रभाग क्रमांक 29 मधून अपक्ष निवडणूक लढवणारे भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांनी काल सोमवारी (दि. 12) भव्य शक्तीप्रदर्शन रॅली काढली. या रॅलीचा समारोप त्यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना मेणबत्ती प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करत केला. प्रभाग 25 आणि 29 मधील निवडणूक सध्या विशेष गाजत असून, माजी आमदार सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांनी प्रभाग 25 मधून माघार घेत थेट प्रभाग 29 मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरावे लागले आहे.
सुधाकर बडगुजर यांचा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत नाचतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती आणि हा मुद्दा विधिमंडळातही गाजला होता. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर बडगुजर यांनी आपण अनावधानाने तिथे गेलो होतो, असे स्पष्टीकरण यापूर्वीच दिले आहे. मात्र, हाच मुद्दा पुन्हा पुढे करत मुकेश शहाणे यांनी आपल्या रॅलीतून सलीम कुत्ता प्रकरणाला उजाळा देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. हजारो मेणबत्त्यांच्या प्रकाशात श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















