Nashik Mahanagarpalika Election 2026: गिरीश महाजनांकडे जाऊन आलो, मुख्यमंत्र्यांनीही सांगितले तुम्ही निवडणूक लढणार, पण...: अपक्ष शड्डू ठोकलेल्या मुकेश शहाणेंनी सगळंच सांगितलं!
Nashik Mahanagarpalika Election 2026: मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. धनदांडग्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे, असे देखील मुकेश शहाणे यांनी म्हटले आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर भाजपमधील (BJP) बंडखोरी अधिक तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग 29 मधील ‘अ’ गटासाठी दीपक बडगुजर व मुकेश शहाणे यांनी भाजपकडून एबी फॉर्म सादर केले होते. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बडगुजर यांचा एबी फॉर्म वैध ठरवला. तर शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवला. यानंतर आता भाजपचे बंडखोर माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना मुकेश शहाणे म्हणाले, भाजपने मला एबी फॉर्म दिला. पण जे झाले ते झाले. काही लोकांना घराणेशाही हवी आहे. घरातील सर्वांना उमेदवारी पाहिजे. मी अपक्ष निवडणूक लढणार आहे. धनदांडग्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे. जनेतच्या बळावर मी निवडणूक लढणार आहे. मागील संघर्ष घेऊन केसाने गळा कापला. पण मित्रांनी, जनतेने निवडणूक हातात घेतली आहे, असे त्यांनी म्हटले.
Mukesh Shahane: मुख्यमंत्र्यांनीही सांगितले मुकेश शहाणे निवडणूक लढणार
मुकेश शहाणे पुढे म्हणाले की, मी एकनिष्ठेने पक्षाचे काम केले. जनतेचा विश्वास आहे, मी निवडून येणार आहे. गिरीश महाजन यांच्याकडे जाऊन आलो. मुख्यमंत्र्यांनीही सांगितले की, प्रभाग क्रमांक 29 मधून मुकेश शहाणे निवडणूक लढणार आहे. पण, तरीही जो प्रकार घडला, त्यावर कारवाई होणार आहे, असा विश्वासदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Girish Mahajan: गिरीश महाजन शहाणेंची समजूत काढण्यात अपयशी
भाजपमधील वाढती बंडखोरी थांबवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. उमेदवारी माघारीचा आज शेवटचा दिवस असल्याने भाजपसाठी हा अत्यंत निर्णायक टप्पा होता. शहाणे–महाजन यांच्यात बैठक होऊनही, मुकेश शहाणे यांची समजूत काढण्यात महाजन अपयशी ठरल्याचे दिसून आले.
Ruchi Kumbharkar: प्रभाग क्रमांक तीनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
दरम्यान, प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर यांना भाजपाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र शेवटच्या काही वेळात पक्षाने समजूत काढल्याने माघारी घेण्यासाठी रुची कुंभारकर पोहोचले होते. मात्र कुंभारकर यांच्या समर्थकांकडून माघार घेऊ नका असे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ घालण्यात आला. भाजपचे अधिकृत उमेदवारांनी रुची कुंभारकर यांना अर्ज माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेले. मात्र वेळ संपल्यामुळे रुची कुंभारकर माघार होऊ शकले नाही. रुची कुंभारकर यांनी निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेत भाजपच्या विरोधात बंडखोरीचे निशाण फडकवले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा




















