Maharashtra Politics अमरावती :

  अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभेचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे एक बॅनर सध्या चर्चेत आले आहे. या बॅनरमुळे आमदार रवी राणा यांनी स्वतःच महायुतीची (Mahayuti) उमेदवारी जाहीर केली का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर महायुतीचे अधिकृत उमेदवार असा उल्लेख असलेले बॅनर फिरत आहे. मात्र यात मतदारसंघ कोणता हे मात्र लिहलं नसल्याने अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहे. अशातच यावर आता स्वत: आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी माहिती देत याबाबत खुलासा केला आहे.


देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून हिरवी झेंडी- रवी राणा   


गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मी महायुती सोबत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात, शुभेच्छा देतात, बॅनर लावतात, तोच उत्साह त्या बॅनरच्या माध्यमातून झळकला आहे. मीच आमदार आहे, मीच अधिकृत उमेदवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हिरवी झेंडी दिली आहे. जे आमदार महायुती सोबत आहेत त्यांच्यासाठी त्या जागा सुटणार आहेत. तर काही जागा आम्ही मागितल्या आहेत. मात्र, काही विघ्न संतोषी लोक असतात.  ज्यांना आपण लोकसभेमध्ये देखील पाहिलं. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम काही लोकांनी केलं. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते काम करतात. त्याला काही इलाज नाही. त्यांचा पक्ष, त्यांचे नेते त्या बाबत निर्णय घेतील. असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर स्पष्टोक्ती देत नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर टीका ही केली आहे.


 बच्चू कडू हे नेहमी बालिश वक्तव्य करतात- रवी राणा 


नवनीत राणा यांना रवी राणांनी मतदार संघात 28 हजारांची लीड दिली. बच्चू कडू हे नेहमी बालिश वक्तव्य करतात. लोकसभे आधी त्यांनी कुणाची सुपारी घेतली होती हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा एकच नारा होता, नवनीत राणांना पाडायचं आहे. जो व्यक्ती नेहमीच सुपार्‍या घेऊन काम करतो, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बडनेरा मतदारसंघाने 28 हजारांचा लीड नवनीत राणाना दिला. त्यामुळे ते आता काहीही बोलले तरी अचलपूर मतदार संघातील जनता त्यांना प्रश्न विचारणार आहे. अशी टीका करत रवी राणांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केलं आहे. 


हे ही वाचा