अहिल्यानगर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Elections 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) जोमाने तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत फूट पडण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


महाराष्ट्रात यंदा 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरु आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. 


...तर महायुतीचे नुकसान होणार


श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट पडण्याचे संकेत आहेत. काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका, अशी मागणी श्रीरामपूरमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. या मतदारसंघात हिंदुत्वासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय.  ऐन वेळेला काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास महायुतीचे नुकसान होणार, अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 


दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात न करण्याचा इशारा


शिवसेना शिंदे गटाने काँग्रेसी विचारधारेचा उमेदवार दिल्यास आम्ही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा भाजप ओबीसी मोर्चाचे सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. श्रीरामपूर मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे हे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील उमेदवार आयात न करण्याचा इशारा भाजपने दिल्याने महायुतीत फूट पडणार आल्याचे दिसून येत आहे. आता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठरला?


दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप 140 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर शिंदे गट 80 ते 87 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 60 ते 65 जागा लढणार येऊ शकतात. तर 20 ते 25 जागांवर अजूनही चर्चा सुरु असल्याचे समजते. उरलेल्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आता महायुतीचे जागावाटप नेमके कधी जाहीर होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप