Mahayuti Seat Sharing : महाविकस आघाडीप्रमाणे महायुतीमध्ये देखील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये 3 पक्ष आल्याने इच्छुकांची संख्या मोठी झाली आहे. महाविकास आघाडीत परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर दोन उमेदवार घोषित केलेले असताना आता महायुतीत ठिणगी पडली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवार घोषित केलेल्या जागांवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरांनी लढण्याची तयारी केली आहे. 


सोलापुरातील 3 जागांवर शिंदेंचे बंडखोर निवडणुकीच्या मैदानात 


शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदार संघात भाजपने उमेदवार दिल्याने महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सोलापुरातील तीन मतदार संघात भाजप विरोधात ‘शिवसेनेचे अपक्ष’ म्हणून लढणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह एकूण पाच उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील तीन मतदारसंघात भाजप विरोधात लढणार आहेत. 


सुभाष देशमुख यांच्या विरोधात शिंदेंचे तीन उमेदवार रिंगणात 


शहर उत्तर, शहर मध्य, शहर दक्षिण 3 शिवसेनेचे उमेदवार भाजप विरोधात निवडणुकीत उतरणार असल्याचे सोलापुरातील शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्पष्ट केलं आहे. शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख विरोधात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे अपक्ष फॉर्म भरणार आहेत. शहरमध्य विधानसभेत भाजपच्या देवेंद्र कोठे विरोधात शिंदे गटाचे मनोज शेजवाल रिंगणात उतरणार आहेत. तर दक्षिण सोलापुरात भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्या विरोधात उमेश गायकवाड, अण्णाप्पा सतुबर, देवानंद विटकर हे तीन शिवसेना नेते लढणार आहेत. हे पाच ही उमेदवारी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. आता याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


महाविकास आघाडीतही परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर वाद सुरु आहे. कारण परांडा आणि दक्षिण सोलापूरच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेला असताना आता पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेस उमेदवार घोषित केले आहेत. उद्धव ठाकरेंनी दक्षिण सोलापुरात अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिथे काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. तर परांड्यात ठाकरेंनी रणजीत पाटील यांना तिकीट दिले होते. या जागेवर शरद पवारांनी राहुल मोटेंनी उमेदवारी दिली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


MahaVikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता, ठाकरेंनी उमेदवार घोषित केलेल्या जागांवर काँग्रेस अन् शरद पवारांनी नवा चेहरा उतरवला