MahaVikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित केलेल्य जागांवर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केले आहे. धाराशिवमधील परांडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाने रणजीत पाटील यांना उमेदवारी घोषित केलेली असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे दक्षिण सोलापुरात ठाकरेंनी अमर पाटील या शिवसैनिकाला उमेदवारी घोषित केली होती. त्या जागेवर काँग्रेस पक्षाने दिलीप माने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत दोन जागांवर ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 


मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यानुसार अर्ज भरणार, अमर पाटील यांनी भूमिका मांडली 


दक्षिण सोलापुरात महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केलेली असताना काँग्रेसने देखील उमेदवारी जाहीर केल्याने नवा वाद सुरु झाला आहे. “काँग्रेसने दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी मी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार", अशी भूमिका ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांनी घेतली आहे. उद्या सकाळी शक्ती प्रदर्शन करतं अमर पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. "संजय राऊत यांनी मला सांगितलेलं आहे की तुम्ही अर्ज दाखल करा, त्यामुळे मी माझ्या वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यानुसार अर्ज भरणार आहे. 
लढाई कोणासोबतही असली तरी आम्ही लढणार", असं अमर पाटील म्हणाले आहेत. 


शिवसेनेने रामटेकची जागा शेवटपर्यंत सोडली नाही, काँग्रेस उमरेडमधून लढणार 


काँग्रेसकडून उमरेडच्या जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. संजय मेश्राम यांना काँग्रेसने उमरेड या एससी राखीव जागेवरून उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात जागावाटपामध्ये पेच असलेल्या जागेपैकी एक जागा म्हणजे उमरेड ही होती. रामटेक द्या आणि उमरेड घ्या अशी काँग्रेसची आग्रही भूमिका शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेने रामटेक काँग्रेससाठी सोडली नाही, येथून विशाल बरबटे यांना ठाकरेंच्या सेनेने उमेदवारी दिली. त्यानंतर आज काँग्रेसने जारी केलेल्या यादीमध्ये उमरेडमधून काँग्रेसचे नेते संजय मेश्राम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संजय मेश्राम यांनी यापूर्वीही 2014 मध्ये उमरेडमधून काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली होती.मात्र त्यात ते पराभूत झाले होते.संजय मेश्राम हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिव पदावर आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Congress Candidate List : महाराष्ट्रात काँग्रेसचा धमाका, आत्तापर्यंत 99 उमेदवार जाहीर, दोन घोषित केलेल्या जागांवर चेहरा बदलला, पुणे अन् सोलापुरात कोणाला संधी?