मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 20 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीची घोषणा केली आहे. शिवसेनेनं पहिल्या यादीत 45 उमेदवारांना स्थान दिलं होतं. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 65 उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीच्या जागावाटपा संदर्भातील बैठकांचं सत्र सुरु असताना  शिवसेनेची दुसरी यादी आलेली आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत मिलिंद देवरा, संजय निरुपम, आमदार भावना गवळी, निलेश राणे, आमदार आमश्या पाडवी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 


राज्यसभेचे खासदार आदित्य ठाकरेंविरुद्ध मैदानात


एकनाथ शिंदेंकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरेंविरुद्ध मैदानात उतरवलं आहे. आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मिलिंद देवरा हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.


माजी खासदार रिंगणात


एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या यादीत संजय निरुपम आणि निलेश राणे या दोन माजी खासदारांना स्थान देण्यात आलं आहे. संजय निरुपम दिंडोशी विधानसभा लढवणार आहेत. ते सुनील प्रभू यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. निलेश राणे हे देखील माजी खासदार असून ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार असून त्यांच्या विरुद्ध वैभव नाईक हे रिंगणात आहेत. 


विधानपरिषदेचे दोन आमदार रिंगणात 


विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी आणि  आमदार भावना गवळी या विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भावना गवळी देखील माजी खासदार आहेत. आमश्या पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांच्या विरुद्ध आमश्या पाडवी निवडणूक लढवणार आहेत. भावना गवळी या वाशिमच्या रिसोडमधून निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीत रिसोडची जागा काँग्रेसकडे असून त्यांनी अमित झनक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं रिसोडमध्ये अमित झनक विरुद्ध भावना गवळी अशी लढत होईल. 


बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी


हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 


अंधेरीत मुरजी पटेल तर कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर 


एकनाथ शिंदे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून प्रवेश केलेल्या मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून स्वीकृती शर्मा इच्छुक होत्या. तर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 


इतर बातम्या :


Shivsena Eknath Shinde 2nd Candidate List : शिंदेंची शिवसेनेची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट, भावना गवळींना रिसोडमधून उमेदवारी