Mahad Vidhansabha Election : आमदार भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.27) ठाकरेंच्या शिवेसेनेत प्रवेश केलाय. माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांचे चिरंजीव शैलेश देशमुख यांच्यासह माजी सरपंच आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी महाविकास आघाडीच्या महाड विधानसभेच्या उमेदवार स्नेहल जगताप उपस्थित होत्या. या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून स्नेहल जगताप यांची ताकद वाढली आहे.
महाडमध्ये स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले सामना रंगणार
महाड विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने स्नेहल जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार भरत गोगावले यांना पु्न्हा एकदा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे स्नेहल जगताप विरुद्ध भरत गोगावले असा सामना महाडमध्ये असणार आहे. काही दिवसांपूर्वी भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर स्नेहल जगताप चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. आता दोघांमध्ये विधानसभा निवडणुकीत काटे की टक्कर होणार असल्याची चर्चा आहे.
स्नेहल जगताप कोण आहेत?
स्नेहल जगताप या महाडच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांनी मे 2023 मध्ये काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता. स्नेहल जगताप या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. शिवाय काँग्रेसमधून त्यांनी शिवेसेनेत प्रवेश केल्यानंतर महाडमध्ये ठाकरेंच्या शिवेसेनेची ताकद वाढली होती. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांचे कडवे आव्हान असणार आहे. ठाकरे गटात प्रवेश करताना महाविकास आघाडी हेच माझे घर असल्याचेही जगताप म्हणाल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या