मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) सांगली जिल्ह्यातील मीरज या जागेसाठी वाद चालू आहे. मीरज ही जागा आम्हालाच मिळावी, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा हट्ट आहे. तर काँग्रेस पक्ष ही जागा सोडण्यास तयार नाही. लोकसभा निवडणुकीतही सांगली हा मतदारसंघा असाच चर्चेत आला होता. या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना तिकीट दिले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसारखीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे. मीरज जागेसारखीच लागण प्रत्येक मतदारसंघाला लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अडचणी होतील, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला आहे. ते आज (28 ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस आणि आमच्यात चर्चा झाली आहे. दिग्रस येथून आमचा उमेदवार निवडणूक लढवणार नाही. आम्ही ती जागा माणिकराव ठाकरे यांच्यासाठी सोडलेली आहे. काल यावर चर्चा झाली. या चर्चेनुसार दिग्रसच्या बदल्यात काँग्रेसने आम्हाला दर्यापूर हा मतदारसंघ आम्हाला दिला आहे. भूम-परांडा मतदारसंघाबाबतही आमच्यात आणि शरद पवार यांच्यात वाद नाही. ही जागा एकमेकांना बदलावी, यावर आमची चर्चा झाली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.
...तर महाविकास आघाडीला अडचणी होतील
तसेच दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मीरजमध्येही काँग्रेसचे काही लोक आमचा उमेदवार द्यावा, असं सांगत आहेत. याबाबत माझ्या कानावर आलं आहे. असं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल आणि महाविकास आघाडीला अडचणी होतील. म्हणूनच तिघांनीही एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा, असं आम्ही ठरवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मीरजचा नेमका तिढा काय?
मीरज जागेबाबत महाविकास आघाडीत सध्या धुसफूस चालू आहे. या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. काँग्रेसलाही ही जागा हवी आहे. खानापूर ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेल्यास आम्हाला मीरज जागा हवी आहे, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. त्यामुळेच काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघआडीत ही जागा नेमकी कोणाला मिळणार? याकडे सर्वांच लक्ष लागलंय.
हेही वाचा :
शरद पवार गटाची उमेदवारी मलाच मिळेल, रणजित शिंदेंचा दावा, माढा विधानसभेसाठी भरले दोन अर्ज
माढा, माळशिरसचा तिढा कायम! माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी घेतली फडणवीसांची भेट