मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीतील हायव्होल्टेज लढत ठरण्याची शक्यता असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात सध्या अभूतपूर्व अशा राजकीय तिढा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, ऐनवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी माहीममधून लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, असे सूर महायुतीमधूनच उमटू लागले होते. भाजप आणि शिंदे गटाच्या (Shinde Camp) काही नेत्यांनी अमित ठाकरे यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. मात्र, सदा सरवणकर यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, या बैठकीत सदा सरवणकर यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही निरुत्तर झाल्याचे सांगितले जाते.


सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून माघार घ्यावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदा सरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांना विचारले की, 'मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा, मी निवडणूक लढवली तर मी जिंकेन की हरेन?'. मी गेली 30 वर्षे माहीम भागाचे लोकप्रतिनिधित्त्व करत आहे. सदा सरवणकर यांच्या या प्रश्नावर एकनाथ शिंदे हेदेखील निरुत्तर झाल्याचे पाहायला मिळाले.


एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्याशी बराचवेळ चर्चा केली. राज ठाकरे यांचे भाजपमधील अनेक नेत्यांशी चांगले संबंध असल्याने सदा सरवणकरांच्या माघारीसाठी मुख्यमंत्र्यांवर भाजपच्या गोटातून बराच दबाव असल्याचे सांगितले जाते. पण सदा सरवणकर हे गेली 30 वर्षे दादर आणि माहीम भागात लोकप्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्याला माघार घ्यायला सांगणे, हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अवघड असल्याचे सांगितले जाते.


अमित ठाकरेंना लढायचं होतं तर आधीच सांगायला पाहिजे होतं: सदा सरवणकर


शिंदे गटातील दीपक केसरकर यांनीही अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, असे म्हटले आहे. भाजपचे आशिष शेलार, नितेश राणे हेदेखील अमित ठाकरे यांच्या बाजूने आहेत. मात्र, सदा सरवणकर हे ऐनवेळी माघार घेण्यासाठी तयार नाहीत. राज ठाकरे यांना आपल्या मुलाला माहीम विधानसभेतून रिंगणात उतरवायचे होते तर तशी चर्चा आधी करायला पाहिजे होती. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चा करणे निरर्थक आहे, असे सदा सरवणकर यांचे म्हणणे आहे. आम्ही निवडणुकीसाठी पत्रकं छापलेत, झेंडे घेतलेत. गटप्रमुख, बुथप्रमखांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ऐनवेळी माघार घेणे शक्य नाही. अन्यथा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा फटका बसेल, असे सदा सरवणकर यांचे मत आहे. त्यांनी या सर्व गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याचे समजते. 



आणखी वाचा


मागे भगवा रंग अन् चार ओळींचं संदेश; वडिलांचा निर्णय मुलानंच सांगून टाकला; माहीममधून तिहेरी लढत अटळ?