मुंबई : रविवारी (27 ऑक्टोबर) रात्री उशिरा वांद्रे टर्मिनसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या एकूण दहा जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे. प्रवाशांची गर्दी होणार, याची कल्पना असताना कोणतेही नियोजन का करण्यात आले नव्हते? असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आता याच चेंगराचेंगरीच्या अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. याच चेंगराचेंगरीत टाईल्स लावून लोकांच्या घरांची शोभा वाढवणाऱ्या तरण्या इंद्रजितचंही आयुष्य आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. 


रेल्वेची क्षमता 2000 तिकिटं दिली 2500


मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनसपासून निघणारी आणि उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पोहोचणारी ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित होती. या रेल्वेची प्रवासी क्षमता ही 2036 होती. मात्र रेल्वे अनारक्षित असल्यामुळे एकूण 2540 तिकिटांची विक्री करण्यात आली. म्हणजेच क्षमतेपेक्षा साधारण 500 अतिरिक्त प्रवाशांना तिकीट देण्यात आले. त्यामुळेच चेंगराचेंगरीची शक्यता वाढली. 


प्रवाशांना रांगेने सोडले नाही


क्षमतेपेक्षा अधिक तिकीटविक्री झाल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांना रांगेने रेल्वेत सोडले नाही. त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली, तेव्हा एकच गोंधळ उडाला आणि यात अनेकजण जखमी झाले.


वांद्रे टर्मिसवर अशा प्रकारे गर्दी झाली होती, पाहा व्हिडीओ :



इंद्रजितच्या मांडीचे हाड मोडले 


छट पूजा आणि दिवाळी साजरी करण्यासाठी मुंबईत कामासाठी आलेले उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात त्यांच्या मूळ गावी जाजात. रविवारी वांद्रे-टर्मिनस या स्थानकावरही बरेच उत्तर भारतीय जमले होते. मात्र रेल्वेत चढताना येथे रात्री चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. यात 19 वर्षीय इंद्रजित सहानी याचाही समावेश आहे. या चेंगराचेंगरीत इंद्रजितचा पाय मांडीमध्ये मोडला आहे. वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीच्या स्थळावर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्यावर सध्या उपचार चालू आहेत.


इंद्रजितचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता? 


इंद्रजितचं सहानी हा तरुण अवघ्या 19 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो विक्रोळीत एका खासगी कंत्राटदाराकडे टाईल्स बसवण्याचे काम करतो. मात्र वांद्र्यातील चेंगराचेंगरीत त्याच्या पायाला मार लागला. लोकांनी त्याला पायाने तुडवलं. तो यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या मांडीचे हाड तुटले आहे. लोक त्याच्या अंगावरून जात होते. त्याने बचावाचा प्रयत्न केला. पण पाय जायबंदी झाल्यामुळे तो काहाही करू शकला नाही. पायाच्या रक्तवाहिन्या जोडल्या न गेल्यास त्याचा पाय कापावा लागू शकतो. डॉक्टरांनी तशी माहिती दिली आहे. तसे झाल्यास तरूण इंद्रजित आयुष्यातून उठण्याची शक्यता आहे.  


हेही वाचा :


Bandra Terminus Stampede : मोठी बातमी! वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, दोघांची प्रकृती गंभीर


Bandra Railway Station Stampede Video : कुणाची मांडी फाटली, कोणाचा हात तुटला, प्लॅटफॉर्मवर रक्ताचा सडा; वांद्रे टर्मिनसच्या चेंगराचेंगरीचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!