Madha Vidhansabha Election : माढा विधानसभा मतदारसंघ (Madha Vidhansabha Election) हा सध्या राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. गेली सहा टर्म इथं आमदार असलेले अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे (Babandada Shinde) यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्याकडे आपला मुलगा रणजित शिंदे यांच्यासाठी  उमेदवारीचे प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच आज रणजित शिंदे (Ranjit Shinde) यांनी शुभमुहूर्तावर अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शरद पवार गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर 28 तारखेला पुन्हा जनतेसोबत येऊन अर्ज दाखल करणार असल्याचे रणजित शिंदे म्हणाले. 


शरद पवार गटाची उमेदवारी आपल्याला मिळेलच, रणजित शिंदेंचा दावा


माढा विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडे रणजित शिंदे यांच्यासोबत अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे असे अनेक दिग्गज उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आज अखेर रणजित शिंदे यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अजूनही शरद पवार गटाकडून उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी आमदार बबनदादा शिंदे हे मुंबईत तळ ठोकून आहेत. त्यामुळेच आज आपल्या वडिलांशिवाय रणजित शिंदे यांनी आपल्या मातोश्री व इतर कार्यकर्त्यांच्या समवेत बुलेटवर येऊन आपली उमेदवारी दाखल केली. शरद पवार गटाची उमेदवारी आपल्याला मिळेलच असा विश्वास रणजित शिंदे यांनी व्यक्त केला. पण जर उमेदवारी मिळाली नाही तरी आपण अपक्ष  निवडणूक रिंगणात उतरणार असून आपला 100 टक्के विजय होईल असा दावा रणजित शिंदे यांनी केला आहे.


शरद पवार गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील


माढा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्याकडून बंधू रणजितसिंह मोहिते पाटील ( Ranjitsinh Mohite Patil) यांना उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु आहे. दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीत तुतारीची साथ सोडून भाजपला मदत करणारे अभिजीत पाटील यांची सत्तत्यानं शरद पवारांची भेट घेणं सुरु आहे. तसेच माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे या देखील पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याचबरोबर संजयबाबा कोकोटे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, शरद पवार उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Madha Vidhansabha : माढ्यात तुतारीकडून लढण्यासाठी मोठी रस्सीखेच, मोहिते पाटलांनीही लावली लॉबिंग, पण पवारांच्या मनात नेमकं कोण?