Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाविकास आघाडीमध्ये चार मतदारसंघांमध्ये तिढा कायम असतानाच आज (26 ऑक्टोबर) शिरोळचा तिढा (Kolhapur District Assembly Constituency) अखेर सुटला आहे. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये शिरोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून गणपतराव पाटील (Ganpatrao Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गणपतराव पाटील हे दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील सा. रे. पाटील हे सुद्धा काँग्रेसकडून प्रदीर्घ काळ आमदार होते. त्यामुळे हा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसला सुटला आहे. 


कोल्हापुरात महाविकास आघाडीला काँग्रेसला चार जागा सुटल्या 


गेल्या काही दिवसांपासून गणपतराव पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी दावेदारी केल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेसच्याच वाट्याला येणार अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे जागा वाटपामध्ये कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, काँग्रेसच्या दुसऱ्या यादीमध्येही कोल्हापूर उत्तरचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे भूवया पुन्हा उंचावल्या आहेत. दरम्यान, शिरोळमधून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील इच्छूक होते. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र, काँग्रेसने मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं आहे. कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाकडून शाहुवाडीमधून सत्यजित पाटील आणि राधानगरीमधून माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तर सुद्धा काँग्रेसकडे गेल्यास ठाकरे गटाकडे केवळ दोन मतदारसंघ असतील. 


कोल्हापूर उत्तरचे उत्तर अजूनही मिळेना!


दुसरीकडे, कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार काँग्रेसच्या जयश्री जाधव असल्या, तरी त्यांची उमेदवारी निश्चित नाही. त्यामुळे त्यांच्या बदल्यात कोणाला संधी दिली जाणार? याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे महायुतीमध्येही या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर शिंदे गटाकडून राजेश क्षीरसागर आपली उमेदवारी निश्चित मानत असले, तरी मात्र त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेी नाही. त्यामुळे भाजपकडून खासदार धनंजय महाडिक मुलगा कृष्णराज यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.


जोवर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीचा उमेदवार द्यायचा नाही असं काही आहे का? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तरमध्ये सामान्य चेहरा दिला जाईल असं बोललं जात आहे. मात्र, काँग्रेसकडून इच्छुकांची रांग असली तरी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या चर्चा अजूनही कायम आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या