Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही दहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही उमेदवार निश्चितीवरून घोळ सुरूच आहे. बैठकांवरती बैठक होत असल्याने अजूनही कोल्हापूर उत्तर, चंदगड, इचलकरंजी आणि शिरोळ या मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरवता आलेला नाही. या सर्व घडामोडींमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ भलताच धर्मसंकटामध्ये सापडला आहे.


या मतदारसंघांमध्ये दोन्ही आघाड्यांकडून वेट अँड वॉच भूमिका घेण्यात आल्याने अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर उत्तरमधून पहिला पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या चौथ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून अभिजीत राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरच्या रणांगणामध्ये पहिला पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. 


कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर इच्छुक आहेत. मात्र, त्यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने राजकीय भुया उंचावल्या आहेत. या मतदारसंघातून भाजपकडून सुद्धा आक्रमक दावा करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असल्याचे चर्चा रंगली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाटेला जातो याकडे लक्ष आहे.


दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी हा मतदारसंघ आपल्याला मिळेल असा दावा केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावरती ठाकरे आणि काँग्रेसकडून दावेदारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून हा मतदारसंघ मागण्यात आला असला तरी विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसला सुटेल अशी चर्चा वर्तवली जात आहे. मात्र कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही स्पष्टता आली नाही. या मतदारसंघातून विद्यमान आमदार जयश्री जाधव, मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरामी छत्रपती यांच्यासह राजेश लाटकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक इच्छुक आहेत. मात्र उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे लक्ष आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, तातडीने मातोश्रीवर बोलावलं, लालबागच्या मेळाव्यापूर्वी मोठ्या घडामोडी