मुंबई: राज ठाकरे हे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई आहेत. त्यांना एकाचवेळी गुजरात आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात किंमत नाही. त्यांच्या पक्षालाही महाराष्ट्रात स्थान नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि मराठी अस्मितेविषयी राज ठाकरे यांच्या मनात नेमकी काय भूमिका आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रचार करत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांची लढाई ही स्वाभिमानाची आहे. हे दोन नेते स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी या संघर्षात उतरले आहेत. गुजरातच्या दोन खतरनाक व्यापाऱ्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची जी लूट चालवली आहे, ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे दोन फोडले, त्यांच्या बाजूने राज ठाकरे उभे आहेत. त्यांना पाहून मला मोरारजी देसाई यांची आठवण झाली. राज ठाकरे महान नेते आहेत, मला त्यांच्याबाबत बोलायचे नाही. पण त्यांनी उद्धव ठाकरेंकडून टीका करताना भान ठेवावे. उद्धव ठाकरे केवळ शिवसेना पक्षप्रमुखच नाहीत तर पण महाराष्ट्रावर हल्ला करणाऱ्या खतरनाक व्यापाऱ्यांविरोधात त्यांची लढाई सुरु आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंनी यंत्रणा विकत घेतल्यात का, त्यांच्या बॅगा कोण तपासणार? राऊतांचा सवाल
नाशिकमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर त्यांच्या बॅगा तपासल्या होत्या. यावर संजय राऊत यांनी कडाडून टीका केली. कोण कुठे पैशांचं वाटप करतोय, याची आम्ही माहिती सांगतो. सांगोल्यात 15 कोटी पकडण्यात आले, पण पोलिसांनी रेकॉर्डवर 5 कोटींची रक्कम दाखवली. 10 कोटी कुठे गेले? शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला 25 कोटी रुपये पोहोचले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
आमचा उद्धव ठाकरे यांची तपासणी करायला विरोध नाही. पण लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त एका तासासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा बाहेर काढण्यात आल्या. तेव्हा त्या बॅगा कोणीही तपासल्या नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यासोबतच्या बॅगाही कोणी तपासत नाही. या लोकांनी निवडणूक यंत्रणा विकत घेतली आहे का, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
सदा सरवणकरांची भेट का नाकारली?; राज ठाकरेंनी सांगितलं यामगचं कारण, एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर