मुंबई : अनेकजण स्वत:चं घर असावं यासाठी धडपडत असतात. घर खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे बहुसंख्य लोक बँकांकडून कर्ज घेतात. पुढे हेच कर्ज गळफास ठरतं. अनेक लोकांचे संपूर्ण आयुष्य एका घराचे कर्ज फेडण्यातच जाते. मात्र सजग राहून योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास भविष्यात तुमचे घरही होऊ शकते, सोबतच कर्जाच्या विळख्यात न अडकता तुमच्याकडे लाखो रुपये शिल्लक राहू शकतात. हे कसं शक्य आहे, ते समजून घेऊ या...


खर खरेदीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे


समजा तुम्ही घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून तुम्ही 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाचा व्याजदर कमीअधिक असू शकतो. पण हा व्याजदर 9 टक्के आहे, असे समजूया. तुम्ही 20 लाखांचे कर्ज 20 वर्षांच्या मुदतीत फेडण्याचे ठरवले तर तुम्हाला साधारण 17,995 रुपयांचा प्रतिमहिना इएमआय येईल. या 20 वर्षात तुम्ही 20 लाखांच्या घरासाठी साधारण 23 लाख 18 हजार 685 रुपये फक्त व्याज द्याल. म्हणजेच वीस लाख रुपयांच्या घरासाठी 20 वर्षांत तुम्ही बँकेला एकूण 43 लाख 18 हजार 685 रुपये द्याल. मात्र एक शक्कल लढवून तुम्ही बँकेला जाणारे व्याज वाचवू शकता. सोबतच तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरही घेऊ शकता. 


असे घ्या स्वप्नातील घर 


20 लाख रुपयांचे कर्ज घेऊन घर खरेदी करण्यापेक्षा तुम्ही आतापासूनच एसआयपीचा पर्याय निवडला तर पुढच्या 20 वर्षांत तुम्ही आलिशान घर घेऊ शकता. 20 लाख रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला साधारण 18 हजार रुपयांचा इएमआय येत होता. एवढेच पैसे तुम्ही प्रत्येक महिन्याला एसआयपीच्या माध्यमातून 20 वर्षांसाठी गुंतवले तर तुम्हाला 12 टक्क्यांच्या रिटर्न्सप्रमाणे (एसआयपीवर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे गृहित धरले जाते.) साधारण पैसे मिळतील. 18 हजार प्रतिमहिना याप्रमाणे तुम्ही एसआयपी केल्यास वीस वर्षांत तुम्ही एकूण 43 लाख 20 हजार 000 रुपयांची गुंतवणूक कराल. या पैशांवर तुम्हाला तब्बल 1 कोटी 36 लाख 64 हजार 663 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच 20 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1 कोटी 79 लाख 84 हजार 663 रुपये मिळतील. 


भविष्यातील महागाईचा विचार केला तर भविष्यातील 20 वर्षांत तुमच्या या पैशांचे मूल्य नक्कीच कमी होईल. मात्र पैशांचे मूल्य कमी झालेतरी तुम्ही या पैशांत चांगले आणि आलिशान घर खरेदी करू शकता. 
 
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


महागडा आयफोन घेऊन पैशांची माती! त्याच एका लाखाचे होतील 1,76,000, जाणून घ्या जादुई फॉर्म्यूला!