मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने  चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चौथ्या उमेदवार यादीत एकूण सात उमेदवारांचा समावेश आहे महत्त्वाचं म्हणजे काटोल मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे सलील देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सात उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.  चौथ्या यादीत माण,काटोल, खानापूर,वाई, दौंड, पुसद, सिंदखेडा, या मतदारसंघांचा समावेश आहे


चौथ्या यादीमधील उमेदवारांची नावं:


माण - प्रभाकर घार्गे
काटोल- सलील अनिल देशमुख 
खानापूर- वैभव सदाशिव पाटील
वाई-  अरुणादेवी पिसाळ 
दौड- रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा- संदीप बेडसे


काटोलला उमेदवार बदलला 


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रश्मी बर्वे यांच्याप्रमाणं माझ्या उमेदवारीमध्ये अडथळा आणण्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. अनिल देशमुख यांनी माघार घेतल्यानंतर तिथं सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


वाई अन् माणमध्येही उमेदवार जाहीर 


सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे दोन उमेदवार जाहीर झाले नव्हते. माण आणि वाई मतदारसंघात शरद पवार कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं होतं.  माणमध्ये अनेक जण इच्छुक असल्यानं  निर्माण झालेली स्थिती पाहता प्रभाकर देशमुख यांनी माघार घेतली. त्यानंतर अभयसिंह जगताप, अनिल देसाई आणि प्रभाकर घार्गे यांची नावं चर्चेत होती. अखेर शरद पवार यांनी प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 


वाई विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्याकडून धक्कातंत्र वापरण्यात आलं आहे.  वाईतून नितीन सावंत आणि अरुणादेवी पिसाळ यांच्या नावांची चर्चा होती. अरुणादेवी पिसाळ या सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. वाई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी मदनराव पिसाळ यांनी केलं आहे. आता 2024 विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पिसाळ कुटुंबीयांना विधानसभा लढण्याची संधी मिळाली आहे. 






इतर बातम्या :


अनिल देशमुखांनी लेकास उतरवलं मैदानात, सलील देशमुखांनी भरला अर्ज, तरीही म्हणाले, मी मंत्री होणार