नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनिल देशमुख यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अनिल देशमुख यांनी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसून यंदा मुलगा सलीलला उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षनेतृत्वाकडे विनंती करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्यादिवशी सलील देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं दिसून आलं. भाजपा (BJP) सरकार तीन वर्षापासून माझ्या मागे लागलंय, तरी त्यांच्या बापाला मी घाबरत नाही, असे म्हणत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकांसाठी यंदा मुलगा सलीलला मैदानात उतरवत असल्याची माहिती आहे. मी काटोलमधून उमेदवारी फॉर्म भरला नाही, कारण त्यांनी (सत्ताधारी) नियोजन केलं होतं की अनिल देशमुख यांनी फॉर्म भरला, तर काही तरी तांत्रिक अडचणी काढायची  आणि तो फॉर्म रद्द करायचा. त्यासाठी दिल्लीतून मोठे वकील आणून ठेवले आहेत, जे रश्मी बर्वेसोबत झालं, तसंच माझ्यासोबत करण्याचा डाव होता, असा गंभीर आरोपच अनिल देशमुख यांनी केला आहे.  


मी यंदा निवडणुकीसाठी पुन्हा उभा राहिलो असतो तर पूर्ण नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभं न राहता सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. सलीलने मला आग्रह करत उभे राहण्यास  म्हंटले होते. मात्र, मी त्याला समजावून सांगितले आणि तो तयार झाला. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार माहाविकास आघाडीचंच येणार आहे. त्यानंतर शरद पवार साहेब मला पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार बनवतील, असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला, तसेच ते मला मंत्रिमंडळातही घेतील, मात्र त्यासाठी सलील ला विजयी करावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. 


यंदाच्या विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या श्रेष्ठींनी मला संधी दिली. कोविड काळामध्ये मी सातत्याने घरी न बसता मतदारसंघात काम केले. अनिल देशमुख मंत्री असताना मी मतदार संघातील काम सांभाळत होतो. अनिल बाबूंना तुरुंगात टाकल्यानंतर मतदार संघातील नागपूर ते मुंबई पाठपुरावा करत होतो. पुढील काळात तुमचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे, गरीबाचे, तरुणांचे, महिलांचे मुद्दे विधिमंडळात उचलणार असा विश्वास देतो, असे म्हणत सलील देशमुख यांनी काटोलकरांना भावनिक साद घातलीय. अनिल देशमुख यांना मी आश्वस्त केलंय, तुम्ही विदर्भात फिरून प्रचार करा, काटोलची जनता समजुतदार आहे, एकदा भूल केली होती. पण, आता तशी भूल काटोलची जनता करणार नाही, असेही सलील देशमुख यांनी म्हटले. 


दोन दिवसांत अनिल देशमुख यांचं पुस्तक येणार


दरम्यान, अनिल देशमुख यांनी अनुभवाधारित लिहिलेल्या पुस्तकाची देखील माहिती दिली.  माझ्यावर कसे खोटे आरोप लावून फसवण्यात आले, कसे 14 महिने तुरुंगात ठेवले, या सर्व बाबी संदर्भात सर्व काही पुस्तकात लिहिल्याची माहिती दिली. तसेच, पुढील दोन तीन दिवसात ते पुस्तक बाजारात येईल, असेही त्यांनी सांगितले. 


हेही वाचा


जिथं वडिलांचा पराभव जागा ती जागा परत मिळवायचीय; अर्ज भरताना निलेश राणेंनी सांगितला वेदना