Zeeshan Siddiqui on Salman Khan : दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आज झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रावादी काँग्रेसकडून वांद्रे पूर्व येथून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. वांद्र पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी लढत पाहायला मिळणार आहे.


झिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्वमध्ये 'भाईजान'चा पाठिंबा


दसऱ्याच्या दिवशी वांद्रेमध्ये भररस्त्यात बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच मतदारसंघातून अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आणि विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांची लढत पाहायला मिळणार आहे. यादरम्यान, आता अभिनेता सलमान खान याचा आपल्याला पाठिंबा असल्याचं झिशान सिद्दीकींनी सांगितलं आहे.


सलमान खानचा झिशान सिद्दीकींना पाठिंबा


झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे की, वांद्रे पूर्वची जनता माझ्यासोबत आहे. सलमान खानसोबत रात्री बोलणं झालं, त्याने शुभेच्छा दिल्या आहेत. वरुण सरदेसाई त्यांचं काम करत आहेत, मी माझं काम करत आहे. वांद्रे पूर्वची जनता ठरवेल, कुणाला निवडून द्यायचं. शिवसेनेने सत्ता असताना खूप त्रास दिला. त्यांना कधीच वाटतं नव्हत की, इथली कामे व्हावीत. मात्र आमच्यासारखे लोक इथं आहेत.


ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाईंचं टेन्शन वाढलं?


बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सलमान खानचा मोठा चाहतावर्ग पाहता याचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सलमान खान बाबा सिद्दीकी यांचा जवळचा मित्र आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान चर्चेत आला. तो सध्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर असल्याने त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मेरो करण-अर्जुन आयेंगे... सलमान-शाहरुखचा आयकॉनिक चित्रपट 29 वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर, 'या' दिवशी रिलीज होणार