Maharashtra Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : आज लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानानंतर विविध माध्यमांचे एक्झिट पोलचे आकडे जाहीर झालेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध महायुती (Mahayuti) अशी लढत होत आहे. टीव्ही नाईनच्या एक्झिट पोलनुसार नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) हे विद्यमान खासदार असून महायुतीकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात प्रमुख लढत आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) या विद्यमान खासदार आहेत. त्यांना महायुतीकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांचे आव्हान आहे.
राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे आघाडीवर
आता टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, नाशिक आणि दिंडोरीमधून धक्कादायक निकाल येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे आघाडीवर असून हेमंत गोडसे यांना फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहेत. तर केंद्रीय मंत्री भारती पवार या पिछाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्राचा अंदाज काय?
दरम्यान, टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अपक्षाला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 18 जागा, त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 4 जागा, तर काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला 6 जागा, तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आणखी वाचा