La Nina 2024 : देशात सध्या ऊन-पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील जनता उष्णतेच्या झळांनी त्रस्त आहे. दुसरीकडे केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू देश व्यापणार आहे. सध्या अनेक भागात उष्णतेची लाट असली तरी, देशात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक निनो संपून आता ला निना सुरु होणार आहे. यामुळे यंदा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे.
दोन महिने मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरावरील एल निनोचा प्रभाव आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे ला निना सुरु झाल्यावर देशात जोरदार मान्सूनची हजेरी पाहायला मिळेल. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. ला निनामुळे देशात यंदा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन महिने जोरदार पाऊस होणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मुसळधार मान्सून पाहायला मिळे अशी शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
ला निनाचा परिणाम, जोरदार पावसाची शक्यता
हवामान खात्याच्या माहितीनुसार, ला निना लवकरच सक्रिय होणार आहे. एल निनोचा प्रभाव आता संपत आहे. एल निनोमुळे दुष्काळ आणि उष्णता पाहायला मिळत आहे. पुढील काही काळात ला निना सक्रिय होईल, यामुळेसामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने सांगितलं आहे की, यावेळी देशात मान्सून जून ते सप्टेंबरपर्यंत राहील, कारण ला निना या काळातच सक्रिय होण्याची शक्यता आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरात, एल निनो आणि ला नीनामुळे हवामान बदल होतात. एल निनोमुळे तापमान वाढते आणि ला निनामुळे तापमान कमी होते. परिणामी, ला निना परिस्थितीमुळे यंदाज सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, याआधी अमेरिकन हवामान विभागानेही जून ते ऑगस्ट दरम्यान, ला निनाची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला होता.
एल निनो आणि ला निना म्हणजे काय?
प्रशांत महासागराचं विषुववृत्तीय तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्यास, या परिस्थितीला एल निनो असं म्हटलं जातं. तर तापमान कमी होण्याच्या परिस्थितीला ला निना असं म्हटलं जातं. प्रशांत महासागराचं सरासरी तापमानापेक्षा तापमान 0.5 अंश अधिक झाल्यास एल निनोची परिस्थिती निर्माण होते. तापमान 0.5 अंशापेक्षा अधिक झाल्यास जगभरातील वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे देशासह जगभरातील वातावरणावरही याचा परिणाम होऊन हवामानातही बदल दिसून येतो.
मान्सून कधीही येऊ शकतो
माहिती देताना आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, 'दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये कोणत्याही दिवशी दाखल होऊ शकतो. यावेळी ला निनामुळे आणखी पाऊस पडू शकतो. इतर घटकांचा मान्सूनवर परिणाम होतो पण ला निना हा सर्वात मोठा घटक आहे. या कारणास्तव, यावेळी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस पडू शकतो.
जुलैमध्ये सक्रिय होईल ला निना
भारतीय मान्सूनसाठी ला निना सर्वात अनुकूल परिस्थिती मानली जाते. जुलै महिन्यात ला निना पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्प आणि मध्य भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे. तर, उत्तर-पश्चिम भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जून-सप्टेंबरमध्ये पूर्व आणि ईशान्य भारतात कमी पाऊस पडू शकतो. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन आणि पूर येण्याच्या घटना घडू शकतात, असा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे.