ABP Cvoter Exit Poll Results 2024 Maharashtra : लोकसभेच्या सात टप्प्यातील मतदान पूर्ण झालं असून आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एबीपी माझा सी व्होटर सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठा फायदा होत असल्याचं दिसून येतंय तर महायुतीला त्यांच्या जागा गमवाव्या लागतील असं चित्र आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी सहा ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या पदरात केवळ एक जागा पडण्याची शक्यता आहे. आता ती एक जागा नेमकी कुठली, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येणार की रायगडमध्ये सुनील तटकरे हे मात्र स्पष्ट नाही. 


चार जागा लढवल्या, एक जागा जानकरांसाठी सोडली


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकूण पाच जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी बारामतीतील सुनेत्रा पवार यांचा मार्ग सुकर करण्यासाठी त्यांनी परभणीची जागा रासपच्या महादेव जानकरांसाठी सोडली. उर्वरित बारामती, शिरूर, रायगड आणि धाराशिव या चार ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले. त्यापैकी एक जागी त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो असा अंदाज एबीपी सी व्होटर सर्व्हेने व्यक्त केला आहे. 


पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार अजित पवारांना शून्य जागा


टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार, बारामतीध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या आघाडीवर असून सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. त्यामुळे पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळणार नाही. असं जर झालं तर अजित पवारांना तो मोठा धक्का असेल. कारण लोकसभेमध्ये जर पराभव झाला तर त्याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवर होण्याची जास्त शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार नव्या उर्जेने विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातील आणि ते अजित पवार आणि महायुतीसमोर मोठं आव्हान ठरण्याची शक्यता असेल.


राज्यातील 48 मतदारसंघांचा अंदाज व्यक्त केल्यास महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा मिळतील तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. 


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12


TV9 एक्झिट पोल


भाजप : 19
शिंदे गट : 4
अजित पवार गट : 0
ठाकरे गट : 14
काँग्रेस : 5
शरद पवार गट : 6


ही बातमी वाचा: