(Source: Poll of Polls)
Maharashtra Election Exit Poll Results 2024: अजित पवार सहाव्या स्थानावर, तरीही किंगमेकर होणार? बार्गेनिंग पॉवरमुळे मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होणार?
Maharashtra Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात भाजपचे युतीचे म्हणजेच महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा जनमताचा कौल आहे. अजित पवारांवर शरद पवारांचा पक्ष भारी पडणार असल्याच्या देखील चर्चा आता रंगल्या आहेत.
Maharashtra Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात काल (बुधवारी 20 नोव्हेंबर) नेत्यांचे भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले आहे. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर राज्यात कोणाचे सरकार येणार, याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. मात्र, याआधी वेगवेगळ्या एजन्सींच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने अनेक राजकीय प्रश्नही उपस्थित केले आहेत. आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा जनमताचा कौल दिसून येत आहे. राज्यातील 288 जागांपैकी महायुतीला 146 जागा मिळत आहेत, जे बहुमताच्या संख्येपेक्षा फक्त एक जागा जास्त आहे. तर महाविकास आघाडीला 130 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना 12 जागा मिळू शकतात.
महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात येणार?
पवार कुटूंबांनी ठरवल्यास राज्यातीस सत्तेच्या चाव्या हातात येवू शकतात, हे या एक्झिट पोलमधून पुढे येत आहे.अशा परिस्थितीत काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार एकत्र येतील की नाही, अशा अनेक तर्क वितर्काना निवडणूक प्रचारादरम्यान उधाण आलं होतं. त्यांच्या शक्यतेचे संकेतही या एक्झिट पोलमधून मिळत आहेत. जर ते एकत्रित आले तर राज्यात सत्ता स्थापन करू शकतात.
शरद पवार त्यांच्या पुतण्यापेक्षा श्रेष्ठ आहेत का?
पुतण्या अजित पवार यांच्यापेक्षा काका शरद पवार यांची छावणी मजबूत असल्याचे एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एबीपी न्यूजने ज्या सात एजन्सींचे एक्झिट पोल दर्शविले आहेत त्यापैकी तीन एजन्सींच्या ब्रेकअपवरून असे दिसून येते की पुतण्याच्या राष्ट्रवादीपेक्षा काकांची एनसीपी (एसपी) मजबूत आहे.
काका-पुतणे सोबत येतील का?
राज्यात घडलेल्या मोठ्या घडामोडीनंतर पवार काका-पुतणे एकत्र आले तर दोघांची मिळून फार मोठी ताकद तर निर्माण होईलच, पण त्यांच्याशिवाय सरकार स्थापन करणे शक्य होणार नाही. दोघे एकत्र आले तरी वरचढ ठरतील. सरकार त्यांचे बनवण्याच्या संधी मिळेल. दोघे मिळून मोठा दबावगट तयार करू शकतात. ज्यामुळे कोणत्याही युतीला सरकार चालवण्यात अडचण निर्माण होऊ शकते. अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा आधीच होती. त्याची महत्त्वाकांक्षा आणखी जागृत करण्यासाठी एक्झिट पोल पुरेसे असू शकतात. अशा स्थितीत काका-पुतणे एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एक्झिट पोलचे निकाल अचूक आकड्यांमध्ये वळले तर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडणार आहे. मात्र, आत्तापर्यंत झालेल्या टीका आणि परिस्थिती पाहता काका-पुतणे पुन्हा एकत्रित येण्याची पुसटशीही शक्यता दिसून येत नाही.
चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्झिट पोल काय सांगतात
चाणक्य स्ट्रॅटेजीज महायुतीला स्पष्ट बहुमत दिसून येत आहे. महायुतीला 152 ते 160 तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळत आहेत. 6 ते 8 जागा इतरांच्या खात्यात जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. चाणक्य स्ट्रॅटेजीज नुसार, महायुतीत भाजपला 90 पेक्षा जास्त जागा मिळतील. शिवसेना शिंदे यांना 48 अधिक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 22 अधिक जागा मिळतील.
त्याचवेळी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 63 अधिक जागा, शिवसेना ठाकरे पक्षाला 35 अधिक जागा मिळताना दिसत आहेत. उद्धवपेक्षा कमी जागा लढवूनही राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाला 40 हून अधिक जागा मिळाल्या आहेत, त्यांचा स्ट्राइक रेट जास्त आहे. इतर पक्षांनाही 6 ते 8 जागा मिळत आहेत. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि ओवेसींच्या एआयएमआयएमसह अनेक बंडखोर आहेत.
महायुती अर्थात भाजप आघाडीला 46% मते मिळत आहेत, तर महाविकास आघाडीला 41% मते मिळत आहेत. 5% मतांचा फरक असला तरी जागांचा फरक फार मोठा नाही, कारण 6 ते 8 जागांसह इतरांना 9 % मते मिळत आहेत.
चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्झिट पोलचे निष्कर्ष काय आहेत?
प्रचंड बहुमत नसल्यामुळे सरकारमध्ये फूट पडण्याची भीती आहे.
जागा कमी झाल्या तरी अजित पवारांचा पक्ष महत्वाच्या स्थितीत असेल.
अजित पवार यांच्या 22+ जागांशिवाय सरकार स्थिर राहू शकत नाही.
पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवार यांच्याबद्दल जास्त सहानुभूती आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासमोर उद्धव ठाकरेंचा खरा शिवसेनेचा दावा फेटाळला जात आहे.