मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार आहे. अनेक मतदारसंघात इच्छुक उमेदवार तिकीटाची फिल्डिंग लावत आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग झाल्याचे दिसून येत आहे. दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे.
झिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्वमधून मिळाली उमेदवारी
वांद्रे पूर्वचे आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पक्ष प्रवेशावेळी उपस्थित होते. “झीशान त्यांच्या वडिलांचा जनसेवा आणि समाजसेवेचा वारसा पुढे चालू ठेवेल, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, 2019 ची निवडणूक झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्व येथून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली आणि शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
माजी खासदार संजयकाका पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सांगलीचे माजी भाजप खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी आज अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांची पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि तासगाव विधानसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला चांगलं बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रताप पाटील चिखलीकर, देवेंद्र भुयार अजित पवार गटात दाखल
नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. पक्षात प्रवेश करताच राष्ट्रवादीने त्यांना लोहा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर वरुड मोर्शी विधानसभेचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या