पुणे: अखेर पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे  वडगाव शेरीचे विद्यमान आमदार यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक देखील आग्रही होते, तर मुळीक यांना भाजप श्रेष्ठींनी शब्द दिल्याचं देखील त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं, त्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषदेवेळी सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली, त्यानंतर आता मुळीकांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  


जगदीश मुळीकांना श्रेष्ठींचं आश्वासन


पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी काल (गुरूवारी) केला होता. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, पक्षाकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नव्हते. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे या मतदारसंघात पेच निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या. आज सकाळीच सुनील टिंगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.   


सुनील टिंगरेंना अजित पवारांचा फोन


सुनील टिंगरे पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील आमदार आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातामध्ये सुनील टिंगरे यांची भूमिका वादग्रस्त राहिली होती. त्यामुळे सुनील टिंगरे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. सुनील टिंगरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं होतं की, मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली आहे. वडगाव शेरीच्या जागेवर माझा दावा आहे. रात्री मला अजित पवारांचा फोन आला होता. दुसरी यादी येईल. या यादीत माझं नाव असेल, असा मला विश्वास आहे असं टिंगरे काल (गुरूवारी) म्हणाले होते. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकही इच्छूक आहेत. यावर बोलताना टिंगरे यांनी म्हटले की, असे अनेक जण इच्छुक असतात, ते सुद्धा तयारी करतात. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकत नाही. इतर मतदारसंघांमध्ये देखील यामुळे अडचण होऊ शकते, असा गर्भित इशारा सुनील टिंगरे यांनी दिला होता.


दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी जाहीर?


तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील 
अणुशक्तीनगर : सना मलिक 
इस्लामपूर : निशिकांत पाटील 
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर 
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी 
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके