Worli Vidhan Sabha Election 2024 : मुंबई : वरळी विधानसभेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी विधानसभेत शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. मात्र त्यांना आमदारकी लढण्यासाठी उतरवले जाण्याची चिन्हं आहेत. सध्या वरळी विधानसभेत विद्यमान आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरवला जात आहे. त्यामुळे वरळी विधानसभेत तिहेरी लढत होण्याची चिन्हं आहेत.


आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. मात्र यावेळी त्यांना घेरण्याची तयारी महायुती आणि मनसेने केल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचेही माजी खासदार आहेत. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे-फडणवीसांचा 'मास्टर प्लान'


वरळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्यानं त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठकीत पार पडली. या बैठकीत वरळीचा गड आपल्याकडे घेण्यासाठी आणि आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 


राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवायचा नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याचं समजतंय. त्यामुळे आता राज ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतील मदत करणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.