मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे.  बीएमसीचे माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी (Raju Tadvi) यांना चोपडा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी मिळाली आहे. मात्र, राजू तडवी यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 


मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागात तब्बल 31 वर्षे कार्यरत असलेल्या राजू तडवी यांच्याकडे सध्या शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे होती. काही दिवसांपूर्वीच तडवी यांनी मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच निवासस्थानी राजू तडवी यांना एबी फॉर्म दिला आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.  


नितीन दळवी यांनी केली तक्रार


राजू तडवी यांना चोपडा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचा राजीनामा न स्वीकारण्याबाबतची तक्रार महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी (Nitin Dalvi) यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्य सचिव, सचिव नगरविकास खाते व मुख्य निवडणूक आयोगाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


बीएमसी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 218 खासगी प्राथमिक शाळा या 2016 ते 2022 आरटीई मान्यता शिवाय सुरू होत्या. यावर शासनाला अहवाल पाठवणाऱ्या मुंबई उपसंचालकांनी पाठवलेल्या अहवालात या शाळा विना मान्यता चालल्याबाबत शिक्षणाधिकारी बीएमसीवर ठपका ठेवला आहे. या अहवालानुसार राजू तडवी यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा शुशीबेन शहा यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना दिला होता. पण आजतगायत तो अहवाल प्रलंबित आहे. वारंवार आयोगासोबत पाठपुरावा केल्यावर याबाबत माहिती मिळाली म्हणून नितीन दळवी यांनी राजू तडवी यांच्यावर कारवाई संपत नाही व ते दोषमुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी बीएमसी आयुक्तांना केली आहे. जर योग्य कारवाई नाही झाली तर प्रकरण मुख्य निवडणूक आयोग व त्यानंतर  न्यायालयात मांडले जाईल, असेही नितीन दळवी यांनी तक्रारीत म्हटले आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा