Anuradha Paudwal Birthday: सत्तरचे दशक. हा काळ होता जेंव्हा एक नवोदित गायिका चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी बॉलिवूडचा आवाज लता मंगेशकर, आशा भोसले, अलका याज्ञिक अशा अनेक आघाडीच्या गायिकांचा. पण त्यांच्या तोडीस तोड आवाज उभा करणाऱ्या एका गायिकेच्या आवाजाचं सगळीकडंच कौतुक होऊ लागलं. ते कौतुक इतकं होतं की आवाजाची तुलना थेट गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या आवाजाशी! कोणाचा होता हा आवाज?


एका पाठोपाठ एक पार्श्वगायन


अमिताभ बच्चन यांच्या अभिमान चित्रपटातून आपल्या पार्श्वगायनाची सुरुवात आणि नंतर सत्तर आणि ऐंशीचं दशक आपल्या आवाजाच्या जोरावर गाजवलेली गायिका अनुराधा पौडवाल यांचा तो आवाज होता. 1973 मध्ये अभिमानमधून गाण्याची कारकीर्द सुरु केली असली तरी पहिला ब्रेक मात्र 197 साली सुभाष घई यांच्या कालीचरण या चित्रपटानंच अनुराधा यांना मिळाला. त्यानंतर अनुराधा पौडवाल यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आपल्या दमदार आवाजाने बॉलिवूडचे 80 आणि 90 चे शतक गाजवणाऱ्या गायिका अनुराधा पौडवाल यांचा आज वाढदिवस आहे.  


लता मंगेशकरांशी वाद?


एकापाठोपाठ एक सिनेमांमध्ये पार्श्वगायन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, जयदेव यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करत करत कितीतरी हिट गाणी अनुराधा यांनी दिली. पण त्या काळात त्यांचे आणि लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याशी वाद झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या. आता थेट मंगेशकरांच्या दोन गायिकांशी वाद ओढावला म्हटल्यावर इतर संगीतकारांच्याही रडारवर त्या आल्या. हा वाद सुरु झाला त्यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या तुलनेपासून असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याकाळी गुलशन कुमार यांची म्युजिक कंपनी टी- सिरिज ही सर्वात मोठी कंपनी होती. ज्यात प्रत्येकालाच काम करायचं होतं. अनुराधा पौडवाल यांच्यासोबत हातमिळवणी करत अधिकृत गायिकाच करून टाकलं होतं. त्यामुळं नाराजी तर ओढावली पण प्रगती थांबली नाही.


गुलशन कुमारांशी अफेअरच्या वावड्या


टी सिरिजची गायिका झाल्यानंतर अनुराधा यांनी  अनेक हिट गाणी दिली. अशिकी, ऐ दिल है की मानता नही, बेटा यासारख्या चित्रपटांसाठी सलग तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. याच काळात अनुराधा गुलशन कुमार यांच्या आवडत्या गायिका झाल्या. ते अनुराधा यांना त्यांच्या आवाजासहित प्रत्येक बाबतीत समर्थन देत असत. त्यामुळे त्यांच्यात अफेअर असल्याच्या अनेक वावड्या उठल्या. पण उघडपणे कोणही काहीही बोलले नाही.अमिताभ बच्चन यांच्या 'अभिमान' या चित्रपटातून गायनात पदार्पण केले. अनुराधा इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या की त्यांची तुलना लता मंगेशकर यांच्या आवाजाशी होऊ लागली होती. त्यांना गुलशन कुमार यांनी दुसऱ्या लता मंगेशकर अशी उपमा दिली होती. मात्र वैयक्तिक आयुष्यात अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले.  त्यांचे पती आणि मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांचे आणि गुलशन कुमार यांचे संबंध वाढल्याच्या चर्चा होऊ लागल्या.