मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर जोरकसपणे टीका करत आहेत. अशातच संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत, असे राऊत यांनी म्हटले. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कोणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना उद्देशून असलेलं, 'एकतर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन', हे वक्तव्य केवळ राजकारणापुरतं मर्यादित होतं, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्यासोबत मी कधीही चहासुद्धा प्यायला नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे, असे सांगत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी पडद्यामागून चर्चा सुरु असल्याची शक्यताही फेटाळून लावली.  ते शनिवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.


या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, अमित ठाकरे आणि मविआचे जागावाटप अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री हा मविआचाच असेल. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे, असे मला वाटते. आमच्या मित्रपक्षांनी याचा विचार करावा. मित्र शब्दाला किंमत देतो. उद्धव ठाकरे यांनी मविआच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, असे जाहीरपणे सांगितले होते. पण आगामी काळात राज्याचे नेतृत्व कोणाच्या हाती असणार, हे जाहीर झालं तर मतदानाची टक्केवारी वाढते, असा युक्तिवाद संजय राऊत यांनी केला.


अमित ठाकरेंना घासूनपुसून राजकारण कळू द्या, संजय राऊतांचं वक्तव्य


माहीम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी माघार घेतली तर ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, माहीममध्ये आमचा उमेदवार मागे घ्यायला तिकडे पंडित नेहरु उभे आहेत का, इंदिरा गांधी किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उभे आहेत, ज्यांच्यासाठी उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घ्यावा. तरुण मुलांना राजकारणात लढू द्या. त्यांना राजकारण घासुनपुसून कळू द्या. त्यांना समजू द्या राजकारणात काय त्रास आहे तो. तरंच त्यांचं नेतृत्व उभं राहील. आम्ही काय राजकारणात सहजपणे इथपर्यंत आलो आहोत का, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला


यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सततच्या दिल्लीवारीवरुन टोला लगावला. जागावाटप करायला शिवसेना कधीच दिल्लीत गेली नाही. दिल्ली काय त्यांची जहागीर आहे का? एकनाथ शिंदे अजूनही अमित शाह यांना भेटायला हिरवळीवर जाऊन बसतात. त्यांना जागा घ्यायला उठाबश्या काढव्या लागतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली.



आणखी वाचा


महायुतीच्या नेत्यांचा अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा सूर, शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...