नवी दिल्ली : काँग्रेसची सीईसी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला देखील उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि रमेश चेन्निथला यांनी बैठकीत काय घडलं ते सांगितलं. पुढच्या अर्ध्या तासात काँग्रेसची दुसरी यादी येईल, त्यानंतर तिसरी आणि अंतिम यादी उद्या येईल, असं नाना पटोले आणि रमेश चेन्निथला यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्या नाराजीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर देखील नाना पटोलेंनी उत्तर दिलं.
नाना पटोले म्हणाले,आज आमची दुसरी यादी येणार आहे, उद्या आमची तिसरी आणि अंतिम यादी येईल. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीची लोकसभेतील कामगिरीपेक्षा चांगली कामगिरी विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.
महाराष्ट्रात मविआचं बहुमताचं सरकार येईल
विधानसभा निवडणुकीत मविआची चांगली कामगिरी पाहायला मिळेल. बहुमतानं मविआचं सरकार राज्यात येईल, असं नाना पटोले यांनी म्हटलं. राज्यातील महाराष्ट्र द्रोही, शिवद्रोही, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह करणारं सरकार आहे, ते उखडून टाकायचं आहे, असंही नाना पटोलेंनी म्हटलं.मोदी शाह यांच्या सभा जेवढ्या होतील तेवढा मविआला फायदा होईल, असंही नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नाराजीसंदर्भात विचारलं असता काँग्रेसला माध्यमांमधून टार्गेट केलं जातंय, असं दिसत असल्याचं नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसला जागा जास्त मिळाल्या पाहिजेत, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात जागा मिळायला हव्या होत्या पण आघाडी असल्यानं त्या जागा द्याव्या लागल्याचं राहुल गांधी यांना सांगितल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. काँग्रेसची भूमिका सोशल इंजिनिअरिंगची असून त्यानुसार ज्या भागात ज्यांचं प्रतिनिधित्व आहे, त्यानुसार त्या समाजाला जागा देण्याचं काम करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना संपवणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस आहे. त्यासाठी समझोता करावा लागेल तो करु, असं नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीत 2 ते 3 जागांवर अजूनही चर्चा सुरु आहेत.बाळासाहेब थोरात उद्या उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. शरद पवार यांचं पत्र आलेलं आहे.उद्या आमची ऑनलाईन सीईसी होईल आणि अंतिम यादी येईल, असं नाना पटोलेंनी सांगितलं. महाविकास आघाडीचं जागावाटप आहे, त्यात मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावा, असं नाना पटोले म्हणाले.
स्वयंभू विश्वगुरुंच्या पार्टीत काय चाललेलं आहे ते पाहा असंही नाना पटोले म्हणाले. जागा वाटपाचा प्रश्न आहे तो सर्वांसमोर आहे, कार्यकर्त्यांचा दबाव असतो. काँग्रेसला टार्गेट करणं बरोबर नाही, असं त्यांनी म्हटलं.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज अर्ध्या तासात दुसरी यादी येईल. उद्या संध्याकाळ पर्यंत संपूर्ण यादी जाहीर होईल. आज सर्व उरलेल्या जागांवर चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार येईल, हा आम्हाला विश्वास आहे, असं चेन्निथला म्हणाले.
राहुल गांधींच्या नाराजीच्या चर्चा
आजच्या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा आहेत. वाटाघाटी करताना काँग्रेस नेत्यांनी योग्य भूमिका पार न पाडल्याची खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत वाटाघाटीत काँग्रेस कमी पडल्याची भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबई आणि विदर्भातील काही जागा मित्रपक्षांना सोडल्याने राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या :