Dilip Mane Solapur South Vidhansabha News : सोलापूर दक्षिणमधून (Solapur South Vidhansabha) ठाकरे गटानं अमर पाटील (Amar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कारण या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत माने यांनी निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान, आज या सर्व प्रकारावर दिलीप माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  हा माझा अपमान नसून माझे नेते सुशिलकुमार शिंदेचा अपमान असल्याचे माने म्हणाले. त्यामुळं आम्ही फॉर्म भरणार, केवळ दक्षिण सोलापुरातच नाही तर आणखी कुठंकुठं भरतो ते पाहा अशा इशारा माने यांनी दिली आहे. 


अपक्ष लढायचं की कसं ते आम्ही ठरवू


अपक्ष लढायचं की कसं ते आम्ही ठरवू. माझं नुकसान होऊन होऊन काय होईल, आता बघूच असा इशाराही दिलीप माने यांनी दिला आहे. वाघ म्हातारा झालाय म्हणून काय होतं. वाघ वाघ असतो असेही माने म्हणाले. ही निवडणूक आरपारची निवडणूक असेल, जनता जे ठरवेल तोच आमचा निर्णय असेल असंही माने म्हणाले. 


सर्वेत प्रतिस्पर्धीला 25 टक्के आणि आपल्याला 70 टक्के मतं मिळली 


लोकसभेच्या आधी आपण काँग्रेसमध्ये परतलो, तेव्हापासून आतापर्यंत आपण काँग्रेसचा प्रचार करतोय. शिंदे साहेबांचा पराभव भरुन काढायचा होता त्यामुळेच आपण प्रणिती ताईंना निवडून दिल्याचे दिलीप माने म्हणाले. अनेक सर्व्हे झाले त्या प्रत्येक सर्व्हेत आपण पुढे होतो. प्रतिस्पर्धीला 25 टक्के आणि आपल्याला 70 टक्के मतं मिळतं होती असेही माने म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केलेल्या सर्व्हेमध्ये देखील दिलीप माने हेच नावं पुढे होते असे ते म्हणाले. पण आपल्या मित्रपक्षाने कुठला सर्व्हे केला की नाही हे मला माहिती नाही असेही माने म्हणाले.  


माझ्या वडिलांनी बंडखोरी केली, आता माझ्यावर ही तीच वेळ


ठाकरे गटानं या मतदारसंघात अचानक एबी फॉर्म कसा दिला. मग आम्ही आयुष्यभर असेच करायचं का? केवळ बंडखोरी करायची का? माझ्या वडिलांनी बंडखोरी केली, आता माझ्यावर ही तीच वेळ आणली जात असल्याचे दिलीप माने म्हणाले. आपले मित्रपक्ष आहेतच, त्यामुळं मला काहीही विरोधात बोलायचं नाही पण तुम्ही किमान सर्व्हे तरी पाहा असे माने म्हणाले. जिल्ह्यातील मोठ्या मतदारसंघात तुम्हाला भाजप आणायचं की काँग्रेस हे तुम्ही सांगा असंही माने म्हणाले. 
विरोधकांची रणनिती मला माहिती आहे, त्यांना केवळ मी टक्कर देऊ शकतो असं माने यावेळी म्हणाले.  


माझे 11 भाऊ आहेत, मग मी कुठं कुठं उभं करतो ते पाहा


जर हे असच सुरु राहीलं तर माझे 11 भाऊ आहेत, मग मी कुठं कुठं उभं करतो ते पाहा, किती मतं आम्ही खातो मग पाहा असा इशारा देखील माने यांनी दिला आहे. हा माझा अपमान नसून माझे नेते सुशिलकुमार शिंदेंचा अपमान असल्याचे माने म्हणाले. त्यामुळे आम्ही फॉर्म भरणार, केवळ दक्षिण सोलापुरात नाही तर आणखी कुठंकुठं भरतो ते पाहा असा इशारा मानेंनी दिला आहे.