जळगाव: राज्यातील विधानसभा निवडणुकीतील हायव्होल्टेज लढतींमध्ये मुंबईतील माहीम मतदारसंघाचा समावेश आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आपल्या पुतण्याविरोधात उमेदवार दिल्याने त्यांच्यावर मनसेच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. या सगळ्या घडामोडींबाबत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ते शुक्रवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


यावेळी आदित्य ठाकरे यांना अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढत होतात तेव्हा मनसेने तुमच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. मग यावेळी अमित ठाकरे हे पहिल्यांदा निवडणूक लढत असून ठाकरे गटाने त्यांच्याविरोधात उमेदवार का दिला, असा प्रश्न  आदित्य यांना विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, कोण काय बोलतंय, ते मला माहिती नाही. पण ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे. मुंबई ज्याप्रकारे अदानी समूहाला विकली जातेय किंवा फुकटात दिली जातेय, त्याविरोधात आम्हाला लढा देणे गरजेचे आहे. नाहीतर मुंबईत आम्हाला अदानीची परवानगी घेऊन फिरावे लागेल. ही निवडणूक अदानीला जे फुकटात दिलं जातंय त्याच्याविरोधात कोण उभं कोण राहतंय, याची असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.


राज ठाकरे यांचे शिवतीर्थ हे निवासस्थान दादर परिसरात आहे. हा भाग माहीम विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात येतो. या कारणामुळे मनसेने अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून रिंगणात उतरवल्याचे सांगितले जाते. राज ठाकरे यांचा करिष्मा ही अमित ठाकरे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र, त्यांच्यासमोर माहीमचे विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे कडवे आव्हान आहे. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. या दोन्ही नेत्यांचा कार्यकर्ते आणि तळागाळातील जनतेशी चांगला संपर्क आहे. त्यामुळे माहीम विधानसभेची लढाई अमित ठाकरे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.


आणखी वाचा


अमित ठाकरेंना उद्धव काकांबाबत काय वाटतं? म्हणाले, ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं, म्हणून....


'माहीम विधानसभा साहेबांना भेट देणार'; शिंदेंच्या उमेदवारावर रोख, अमित ठाकरेंचं भाषण गाजलं!